IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर लोळवले. अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) या विजयाचा हिरो ठरला. शिवाय शिवम दुबे व तुषार देशपांडे या मुंबईकरांनीही CSKच्या विजयात हातभार लावला. MI चे १५८ धावांचे लक्ष्य चेन्नईने १८.१ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. आयपीएल २०२३ मध्ये मुंबईला अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही आणि आजच्या विजयानंतर रोहित शर्माने ( Rohit Sharma) नाराजी व्यक्त केली.
अजिंक्य रहाणेची वेगवान अर्धशतकी खेळी; CSKची मुंबई इंडियन्सविरुद्ध 'मुंबईकर' अशी यशस्वी रणनीती
रोहित (२१) व इशान ( ३२) यांच्या विकेटनंतर यजमानांची गाडी 'लोकल'सारखी घसरली. सूर्यकुमार यादव ( १), कॅमेरून ग्रीन( १२) आणि अर्शद खान ( १) अपयशी ठरले. तिलक वर्मा अन् टीम डेव्हिड यांनी काहीकाळ संघर्ष केला. रवींद्र जडेजाने १८ चेंडूंत २२ धावा करणाऱ्या तिलकला मागे पाठवले. जडेजाने २० धावांत ३ विकेट्स घेतल्या. सँटनरनेही २८ धावांत २ बळी टिपले. टीम डेव्हिड २२ चेंडूंत ३१ धावा करून माघारी परतला. मुंबई इंडियन्सने ८ बाद १५७ धावा केल्या. तुषार देशपांडेनेही ३१ धावांत २ बळी टिपले.
जेसन बेहरेनडॉर्फने तिसऱ्या चेंडूवर डेव्हॉन कॉनवे ( ०) याचा त्रिफळा उडवला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेने घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध हल्लाबोल केला. अजिंक्यने २७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६१ धावांची वादळी खेळी केली. अजिंक्यने सेट केलेला टेम्पो ऋतुराज व मुंबईकर शिवम दुबेने ( २८) कायम राखला आणि ४३ धावांची भागीदारी केली. अंबाती रायुडू व ऋतुराजने चेन्नईला ७ विकेट्स राखून मॅच जिंकून दिली. ऋतुराज ४०, तर रायुडू २० धावांवर नाबाद राहिले. चेन्नईने १८.१ षटकांत ३ बाद १५९ धावा केल्या.
रोहित म्हणाला, चांगल्या सुरूवातीनंतर आम्ही हरलो.. त्यांच्या फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली. आम्हाला आता अधिक धाडसी खेळ करायला हवा. युवा खेळाडूंच्या पाठीशी आम्ही नेहमीच उभे राहिलो आहोत आणि त्यांना वेळ द्यायची गरज आहे. आता संघातील सीनियर्सनी पुढाकार घेऊन चांगले खेळायला हवं, हे मी माझ्याबाबतीतही बोलतोय.. अजून स्पर्धा बाकी आहे आणि आता तो विजयाचा क्षण आणण्याची गरज आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"