Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2023 MI vs DC: दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सने रोमहर्षक विजय मिळवला. दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू मैदानात मुंबईसाठी खेळत असताना शेवटच्या चेंडूवर २ धावा हव्या होत्या. त्यावेळी टीम डेव्हिडने चलाखीने दोन धावा काढत मुंबईला यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवून दिला. या सामन्याचा हिरो ठरला, मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा. १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने ४५ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. महत्त्वाची बाब म्हणजे रोहित शर्माने २३ एप्रिल २०२१ नंतर मंगळवारी, IPL मध्ये पुन्हा अर्धशतक झळकावले. त्याच्या खेळीमुळेच मुंबई इंडियन्सने पहिल्या विजयाची नोंद केली. हा विजय रोहितसाठी खास ठरला, त्याचे कारण आहे पत्नी रितिका सजदेहचा व्हिडीओ कॉल...
रोहित व इशान यांनी डावाची दमदार सुरूवात करून दिली होती, परंतु ८व्या षटकात इशान ३१ धावांवर रन आऊट झाला. इशानने कर्णधारासाठी स्वतःची विकेट फेकली. पण रोहितने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना फॉर्म परतल्याची झलक दिली. ८०८ दिवसांनंतर रोहितने आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावले. रोहितने दमदार खेळी करत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या साथीने ६५ धावांची खेळी केली. त्याने केलेल्या खेळीमुळे मुंबईच्या संघाला चांगला पाया मिळाला. त्यामुळेच रोहितला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. पण रोहितसाठी त्यापेक्षाही महत्त्वाचा ठरला तो पत्नी रितिकाचा व्हिडीओ कॉल. रितिका बऱ्याचदा आपल्या पतीला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्येच हजर असते, पण या सामन्याच्या वेळी ती मैदानात नव्हती. पण सामना जिंकल्यानंतर मैदानातच तिने रोहितला व्हिडीओ कॉल केला आणि त्याला विजयासाठी शुभेच्छा देत संघाचं कौतुक केले. पाहा व्हिडीओ-
रोहित बाद झाल्यावर, तिलक वर्मानेही दमदार फटकेबाजी करत २९ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ४१ धावा केल्या. सूर्यकुमार यादव पुन्हा गोल्डन डकवर झेलबाद झाला. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर टीम डेव्हिडने १९व्या षटकात दोन षटकारांसह १५ धावा कुटल्या अन् ६ चेंडूंत ५ धावा अशी मॅच आली. अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना ग्रीन व टीम डेव्हिड यांनी त्या काढल्या अन् मुंबईने विजय मिळवला.
Web Title: IPL 2023 MI vs DC Video call from wife Ritika to Rohit Sharma just after Mumbai Indians first win of the season against Delhi Capitals watch video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.