Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2023: मुंबई इंडियन्सच्या संघाला गुजरात टायटन्स विरुद्ध ५५ धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने सहा बाद 207 धावा करून मुंबईला नऊ बाद 152 धावांवर रोखले. गुजरातने 15 षटकांत 4 बाद 130 धावा केल्या होत्या, मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी शेवटच्या पाच षटकांत 77 धावा दिल्या. मुंबईच्या गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये खराब गोलंदाजी केली.
पुन्हा तीच चूक... रोहित संतापला!
रोहितने सामन्यानंतर या कामगिरीवरून गोलंदाजांवर कमालीची नाराजी व्यक्त केली. "हा पराभव खूप निराशाजनक आहे. आम्ही शेवटच्या काही षटकांपर्यंत सामन्यावर पकड ठेवली होती. पण त्यानंतर आम्ही खूप धावा दिल्या. आम्ही पून्हा तीच चूक केली. आमची अडचण गोलंदाजीबद्दल आहे. तुम्ही कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करत आहात हे पाहायला हवे असते पण त्यात आम्ही अपयशी ठरलो. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. प्रत्येक संघाची स्वतःची ताकद असते, आमची फलंदाजी चांगली आहे त्यामुळे आम्ही लक्ष्याचा पाठलाग करू इच्छित होतो. आम्ही सुरुवातीपासून फलंदाजीत संघर्ष केला असला तरी आम्हाला आमच्या फलंदाजीवर जास्त विश्वास आहे.'
शेवटच्या ओव्हर्स गुजरातने मोडलं मुंबईचं कंबरडं...
डेव्हिड मिलरने 14व्या षटकात कार्तिकेय विरुद्ध पहिला षटकार ठोकला, तर अभिनव मनोहरने चावलाच्या षटकात दोन चौकार आणि एक षटकार मारून 17 धावा केल्या. 18व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या ग्रीनविरुद्ध मनोहरने सलग दोन तर मिलरने षटकार ठोकला. या षटकात गुजरातने 22 धावा केल्या. पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मेरेडिथने मनोहरला बाद केले, पण राहुल तेवतियाने क्रीझवर येताच षटकार ठोकून खाते उघडले. मिलरने ओव्हरच्या शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार ठोकला. तेवतियाने शेवटच्या षटकात लागोपाठ दोन षटकार मारत संघाची धावसंख्या 200 पर्यंत नेली.
रोहित शर्मा याबाबतही बोलला. "अशा खेळपट्टीवर जर गोलंदाजाने ठरवून योग्य त्या टप्प्यावर गोलंदाजी केली तर फलंदाज फारशी फटकेबाजी करू शकत नाही. आमच्या गोलंदाजांना धावा रोखणं शक्य झालं नाही. तसंच फलंदाजांनीही निराश केले," असे रोहित म्हणाला.