आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या हंगामातील मुंबई इंडियन्सचा हा चौथा पराभव असून, सात सामन्यात सहा गुणांसह मुंबईचा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. यंदाच्या हंगामात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मासाठी त्याचं सर्वात घातक हत्यारच मोठी डोकेदुखी ठरलं आहे. त्याच्या फ्लॉप शो मुळे मुंबई इंडियन्सला एकापाठोपाठ एक पराभवांचा सामना करावा लागत आहे.
प्रचंड खर्च करून संघात घेतलेला हा खेळाडू मुंबई इंडियन्ससाठी व्हिलन ठरत आहे. तसेच यंदाच्या हंगामात त्याच्या सुमार कामगिरीचा फटका मुंबईला बसत आहे. या खेळाडूचं नाव आहे ईशान किशन. ईशानच्या खराब कामगिरीमुळे मुंबईला यंदा चांगली सलामी मिळणे कठीण झाले आहे. मंगळवारी गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यातही ईशान किशन पूर्णपणे अपयशी ठरला. या सामन्यात गुजरातने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला ईशान किशन कडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र तो केवळ १३ धावा काढून बाद झाला.
ईशान किशनला २०२२ च्या लिलावामध्ये मुंबई इंडियन्सने तब्बल १५.२५ कोटी रुपये खर्च करून संघात घेतले होते. त्याआधी क्लिंटन डी कॉक आणि रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला आक्रमक सुरुवात करून देत असत. मात्र २०२२ मध्ये लखनौ सुपर जायंट्सने डी कॉकला आपल्या संघात घेतले. त्यामुळे मुंबईला मोठा फटका बसला आहे. ईशान किशनने यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून सात सामने खेळताना २६.१४च्या सरासरीने १८३ धावा काढल्या आहेत.