IPL 2023, Mumbai Indians vs Kolkata Kinght Riders Live Marathi : कोलकाता नाइट रायडर्सने ठेवलेल्या १८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने वादळी सुरुवात केली. इशान किशन व रोहित शर्मा यांनी उत्तुंग फटके मारून पॉवर प्लेमध्ये ७२ धावांचा डोलारा उभा केला. इम्पॅक्ट प्लेअर रोहितची विकेट KKRचा इम्पॅक्ट प्लेअर सुयश शर्माने घेतली. पण, रोहितची आजची खेळी ऐतिहासिक ठरली. उमेश यादवने अप्रतिम झेल घेत हिटमॅनला बाद केले अन् वानखेडेवर स्मशानशांतता पसरली.
अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणाची हवा वेंकटेश अय्यरने काढून टाकली. कोलकाता नाइट रायडर्सच्या या फलंदाजाने शतकी खेळी करताना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली. वेंकटेश ५१ चेंडूंत ६ चौकार व ९ षटकारांसह १०४ धावांवर झेलबाद झाला. २००८नंतर KKRकडून शतक झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला. १५ वर्षांपूर्वी ब्रेंडन मॅक्युलमने शतक झळकावले होते. पदार्पणवीर अर्जुन तेंडुलकरने २ षटकांत १७ धावा दिल्या. हृतिक शोकीनने दोन विकेट्स घेतल्या. एन जगदीसन ( ०), रहमनुल्लाह गुरबाज ( ८) व नितीश राणा ( ५) हे अपयशी ठरल्यानंतर वेंकटनेशने खिंड लढवली. शार्दूल ठाकूर आणि वेंकटेश यांनी २७ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रिंकू सिंग ( १८) आज मोठे फटकेबाजी करू शकला नाही. आंद्रे रसेलने ११ चेंडूंत नाबाद २१ धावा करून कोलकाताला ६ बाद १८५ धावा करून दिल्या.
इम्पॅक्ट खेळाडू म्हणून रोहित शर्मा मैदानावर आला. शार्दूल ठाकूरने टाकलेल्या दुसऱ्या षटकात इशान किशनने ४,४,६ अशी फटकेबाजी केली. रोहितने तिसऱ्या षटकात उमेश यादवला धुतले. इशानने चांगलेच हात मोकळे केले आणि सुनील नरीनलाही त्याने सोडले नाही. KKRचा इम्पॅक्ट प्लेअर सुयश शर्मा याचे रोहितने षटकाराने स्वागत केले, परंतु पाचव्या चेंडूवर सुयशने विकेट घेतली. उमेश यादवने अफलातून झेल घेतला अन् १३ चेंडूंत १ चौकार व २ षटकार खेचून २० धावांवर रोहित बाद झाला. मुंबईला ६५ धावांवर पहिला धक्का बसला.
आयपीएलमध्ये एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहितने नावावर केला. त्याने KKR विरुद्ध १०४० धावा करताना शिखर धवनचा ( १०२९ वि. CSk) विक्रम मोडला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"