Join us  

Video: मुंबईला हव्या होत्या ११ धावा, लखनौच्या मालकांनी सुरू केला देवाचा धावा; कॅमेऱ्यानं सगळंच टिपलं!

IPL 2023, MI vs. LSG:

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 1:31 PM

Open in App

आयपीएल स्पर्धेच्या 'प्ले-ऑफ'मध्ये जागा मिळवण्यासाठीची स्पर्धा दिवसागणिक चुरशीची होत चाललीय. गतविजेत्या गुजरात टायटन्सनं 'टॉप ४' मध्ये आपली जागा पक्की केलीय. पण, उर्वरित तीन जागांसाठी चेन्नई सुपरकिंग्ज, मुंबई इंडियन्स, लखनौ सुपरजायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स या पाच संघांमध्ये अटीतटीची लढाई आहे. लखनौसाठी कालचा मुंबईविरुद्धचा सामना अत्यंत महत्त्वाचा होता आणि तो जिंकण्यासाठी त्यांनी अक्षरशः झोकून दिल्याचं सगळ्यांनीच पाहिलं. शेवटच्या षटकात मुंबईला ११ धावा करण्यापासून रोखण्यासाठी लखनौचे शिलेदार मैदानावर शर्थ करत असताना संघाचे मालक संजीव गोयंका देवाची प्रार्थना करताना दिसले. त्यांचा हा श्रद्धाळूपणा नेटिझन्सना भावला आहे. 

लखनौनं प्रथम फलंदाजी करताना मुंबईपुढे विजयासाठी १७८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मार्कस स्टॉयनिसनं ४७ चेंडूत ८९ धावा कुटल्या होत्या. अर्थात, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, नेहल वढेरा, टीम डेव्हीड यांचा फॉर्म बघता हे टार्गेट गाठणं मुंबईसाठी खूप कठीण नव्हतं. त्यामुळे लखनौच्या गोलंदाजांवर मोठी जबाबदारी होती. सुरुवातीला ते थोडे गडबडले, सूर सापडायला त्यांना वेळ लागला, पण नंतर त्यांनी मुंबईच्या अडचणी वाढवल्या आणि सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. पाहा संपूर्ण स्कोअरकार्ड

खरंच दुखापत झाले होती का?; कृणाल पांड्याने सांगितले रिटायर्ट हर्ट होण्यामागचं नेमकं कारण...!

वडील १० दिवस ICU मध्ये होते, हे मी त्यांच्यासाठी केलं; LSG चा 'मॅच विनर' मोहसिन खान झाला भावुक

इतका अटीतटीचा सामना होतो, तेव्हा जिंकण्यासाठी नशिबाचीही साथ लागते, हे याआधीच्या काही सामन्यांमध्ये आपण पाहिलंय. इथे तर मुंबईचा 'गेम चेंजर' टीम डेव्हीड पीचवर होता. १९व्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून त्याने इरादा स्पष्ट केला होता. कॅमेरून ग्रीनही मोठे फटके खेळू शकत होता. त्यामुळे शेवटच्या षटकात ११ धावा करणं मुंबईला शक्य होतं. त्यांना रोखण्यासाठी कृणालसेना मैदानावर होतीच, पण मालकांना कुठलीही कसर सोडायची नव्हती. इथवर येऊन पराभव नको, यासाठी संजीव गोयंका यांनी मनोभावे देवाचा धावा सुरू केला.

शेवटचे तीन-चार चेंडू ते हात जोडून प्रार्थना करत होते, हातात एक छोटा फोटो घेऊन बसले होते, एकदा तो फोटो कपाळाला लावून ते काहीतरी पुटपुटले आणि सामना जिंकल्यावर पुन्हा एकदा त्या फोटोपुढे नतमस्तक झाले. त्यांची हे सगळे हावभाव कॅमेऱ्याने टिपले. त्याचे व्हिडीओ काही नेटिझननी सोशल मीडियावरही पोस्ट केलेत. 

दरम्यान, शेवटच्या ओव्हरमध्ये मोहसीन खाननं कुठलीही चूक होणार नाही याची खबरदारी घेत जबरदस्त गोलंदाजी केली. अत्यंत चलाखीनं चेडूंचा टप्पा टाकत त्यानं टीम डेव्हीडला बॅट फिरवण्याची संधी दिली नाही. त्यामुळे मुंबईला १७२ धावाच करता आल्या आणि लखनौनं विजयश्री खेचून आणत गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.  

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सलखनौ सुपर जायंट्स
Open in App