Join us  

IPL 2023: पंजाब किंग्जचं ट्विट अन् मुंबई पोलिसांचं भन्नाट उत्तर, मुंबईकरांनी ठोकला सलाम

IPL 2023 Mumbai Indians vs Punjab Kings: 'मुंबई इंडियन्स'ला ट्रोल करायला गेले अन् 'पंजाब किंग्ज'चीच झाली 'बोलती बंद'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 11:48 AM

Open in App

Mumbai Police Tweet Reply, IPL 2023 Mumbai Indians vs Punjab Kings: मुंबई इंडियन्सच्या संघाला शनिवारी पंजाब किंग्ज संघाकडून १३ धावांनी पराभव पत्करावा लागला. शिखर धवनच्या अनुपस्थितीत कर्णधार असलेल्या सॅम करनने २९ चेंडूत ५५ धावा ठोकत पंजाब किंग्जला २१४ पर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाने १९व्या षटकापर्यंत तगडी झुंज दिली. पण ६ चेंडूत १६ धावा शिल्लक असताना, मुंबईला फार काही करता आले नाही. त्यामुळे गेल्या तीन सामन्यात विजय मिळवणाऱ्या मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले. या शेवटच्या ओव्हरमध्ये पंजाबच्या अर्शदीप सिंगने दोन चेंडूत दोन वेळा स्टंप तोडून मुंबईच्या फलंदाजांना त्रिफळाचीत केले. त्यानंतर पंजाबच्या ट्विटर हँडलवरून मुंबईची खिल्ली उडवण्यासाठी एक ट्वीट करण्यात आले. त्यावर मुंबई पोलिसांनी भन्नाट उत्तर देत पंजाबचीच बोलती बंद केली.

काय होतं पंजाबचे ट्विट?

पंजाबच्या गोलंदाजीच्या वेळी अर्शदीप सिंगने २०व्या षटकात तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर स्टंप तोडला. ६ चेंडूंत १६ धावा असा सामना रोमहर्षक वळणावर आला अन् अर्शदीपकडे शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी आली. पहिल्या चेंडूवर एक धाव घेत टीम डेव्हिडने तिलक वर्माला स्ट्राईक दिली. अर्शदीपने तिसऱ्या चेंडूवर तिलकचा त्रिफळा उडवला. त्याच्या चेंडूचा वेग इतका होता की मधल्या स्टम्प्सचे दोन तुकडे झाले. आता ३ चेंडू १५ धावा असा सामना आला. नेहाल वधेराचाही स्टम्प त्याने तोडला अन् सामना पंजाबच्या पारड्यात आणला. मुंबईला ६ बाद २०१ धावा करता आल्या अन् पंजाबने १३ धावांनी सामना जिंकला. त्यानंतर पंजाबने मोडलेल्या स्टंपचा फोटो पोस्ट करत मुंबई पोलिसांना टॅग केले आणि आम्हाला स्टंप तोडल्याची तक्रार (FIR) करायची आहे, असं ट्विट केलं.

मुंबई पोलिसांचं भन्नाट उत्तर

मुंबई पोलिसांना टॅग करून पंजाबने ट्वीट केले. त्या ट्विटमध्ये पंजाबच्या अर्शदीपने तोडलेल्या स्टंपचा फोटोदेखील होता. त्यावर मुंबई पोलिसांनी अतिशय भन्नाट उत्तर देत पंजाब किंग्जची बोलतीच बंद केली. 'कुणी कायदा किंवा नियम मोडला असेल तर आम्ही तक्रारीची दखल घेऊन नक्कीच कारवाई करू, पण स्टंप मोडल्यावर (कारवाई करू शकत) नाही,' असे त्यांनी ट्वीट केले. मुंबई पोलिसांच्या या उत्तराला मुंबरईकरांनी खाली कमेंट बॉक्समध्ये सलाम ठोकला.

याशिवाय मुंबई पोलिस (@mumbaipolicee) याच नावाच्या पॅरडी अकाऊंटवरूनही ट्वीट करण्यात आले. त्यातून पंजाबलाच ट्रोल करण्यात आले. 'भारताच्या नागरिकांना जसे आधार कार्ड गरजेचे असते, तसेच IPL संदर्भातील तक्रार करायची असेल तर ट्रॉफी दाखवावी लागेल', असे खतरनाक ट्वीट त्या अकाऊंटवरून करण्यात आले.

दरम्यान, या पराभवामुळे मुंबई आता सातव्या क्रमांकावर तर पंजाब विजयासह पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे.

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्समुंबई पोलीसपंजाब किंग्सट्विटर
Open in App