IPL 2023, Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live : एकाच षटकात दोन्ही सलामीवीर माघारी परतूनही मुंबई इंडियन्सने वानखेडेवर विक्रमी २०० धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. इशान किशनने स्फोटक सुरूवात करून दिली, परंतु रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वनिंदू हसरंगाने एका षटकात दोन धक्के दिले. मात्र त्यानंतर सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि नेहल वढेरा ( Nehal Wadhera) यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करून मॅच एकतर्फी केली. सूर्याने टोलावलेला प्रत्येत चेंडू आज सीमारेषेला चुंबन घेत होता. सूर्याचे शतक थोडक्यात हुकले, परंतु त्याने नेहलसह ६६ चेंडूंत १४० धावांची भागीदारी केली.
इशान किशनने मुंबईला स्फोटक सुरुवात करून दिली, तर दुसऱ्या बाजूने रोहित शर्मा संयमी खेळ करताना दिसला. पाचव्या षटकात वनिंदू हसरंगाने चेंडूचा वेग वाढवला अन् इशानचा यष्टिंमागे सुरेख झेल टिपला गेला. इशान २१ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ४२ धावांवर बाद झाला. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहित ( ७) पायचीत झाला. २ बाद ५२ धावांनंतर सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा यांनी मुंबईचा डाव सावरला आणि १० षटकांत ९९ धावांपर्यंत पोहोचवले. पुढच्या ६० चेंडूंत MI ला १०१ धावा करायच्या होत्या. या दोघांनी MIसाठी उपयुक्त भागीदारी केली. वढेराने ११व्या षटकात वनिंदूला दोन खणखणीत षटकार खेचले अन् त्यातला एक षटकार मैदानावर उभ्या असलेल्या टाटा टिएगो गाडीवर जाऊन आदळला.
सूर्यकुमारने २४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना वढेरासह शतकी भागीदारी पूर्ण केली. सूर्याचा प्रत्येक फटका सीमारेषेचे चुंबन घेत होता आणि त्यामुळे मुंबईच्या डगआऊटमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. MIला दोन धक्के देणाऱ्या वनिंदूच्या गोलंदाजीची सूर्याने एैशी तैशी केली. वनिंदूच्या चार षटकांत ५३ धावा कुटल्या. ३० चेंडू २६ धावा असा सामना मुंबई इंडियन्सच्या पारड्यात पडला. सूर्या ३५ चेंडूंत ७ चौकार व ६ षटकार खेचून ८३ धावांवर बाद झाला. नेहलने ३४ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारासह ५२ धावा करून मुंबईला १६. ३ षटकांत ४ बाद २०० धावा करून विजय मिळवून दिला.
आयपीएल २०२३ च्या अन्य महत्त्वाच्या बातम्या
अम्पायर्स, RCBची युती झाली; रोहित शर्माची विकेट ढापली? 3m नियमाकडे दुर्लक्ष
अर्जुन तेंडुलकरला ४ सामन्यानंतर Mumbai Indiansने पुन्हा का नाही खेळवलं? जाणून घ्या कारण
नेहल वढेराने खणखणीत षटकार खेचला; TATA ला ५ लाखांचा भुर्दंड बसला
तत्पूर्वी, वानखेडे स्टेडियम ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( Glenn Maxwell and Faf du Plessis) या जोडीने दणाणून सोडले. दोघांनी ६२ चेंडूंत १२० धावा जोडल्या. मॅक्सवेलने ३३ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ६८ धावा केल्या. जेसन बेहरेनडॉर्फने ४-०-३६-३ अशी अप्रतिम स्पेल टाकली. ४१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकार खेचून ६५ धावांवर फॅफ झेलबाद झाला. दिनेश कार्तिकने १९ चेंडूंत ३० धावा केल्या. केदार जाधव १२ आणि वनिंदू हसरंगा १२ धावांवर नाबाद राहून संघाला ६ बाद १९९ धावांपर्यंत नेले.