IPL 2023, MI vs RR controversy : मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या १०००व्या सामन्यात विक्रमी विजयाची नोंद केली. वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात मुंबई इंडियन्सने ६ विकेट्स व ३ चेंडू राखून राजस्थान रॉयल्सला नमवले. राजस्थान रॉयल्सने यशस्वी जैस्वालच्या १२४ धावांच्या जोरावर ७ बाद २१२ धावांचा डोंगर उभा केला. कॅमेरून ग्रीन ( ४४), सूर्यकुमार यादव ( ५५) यांनी मुंबई इंडियन्सला विजयपथावर आणले. तिलक वर्मा ( २९) व टीम डेव्हिड (४५) यांच्या नाबाद खेळीने मुंबई इंडियन्सने रोमहर्षक विजय मिळवून दिला.
टीम डेव्हिडने २०व्या षटकात जेसन होल्डरला सलग तीन षटकार खेचून सामना जिंकला अन् MIने इतिहास रचला. वानखेडे स्टेडियमवरील प्रथमच २००+ लक्ष्याचा पाठलाग केला गेला अन् ही आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. वानखेडे स्टेडियमवर यापूर्वी २०१९मध्ये मुंबई इंडियन्सने ठेवलेले ७ बाद १९८ धावांचे लक्ष्य पंजाब किंग्सने पार केले होते. पण, या सामन्यात रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) विकेटने मोठा वाद सुरू झाला होता. संदीप शर्माने टाकलेल्या चेंडूने अनपेक्षित उसळी घेतली अन् रोहित त्यावर फसला.
रोहितला त्रिफळाचीत होऊन माघारी जावे लागले. त्यानंतर सोशल मीडियावर या विकेटची जोरदार चर्चा सुरू झाली आणि काही व्हिडीओ व्हायरल झाले. त्यात चेंडू व बेल्स यांच्यात संपर्क झाला नव्हता अन् यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या ग्लोव्हजला लागून बेल्स पडल्याचा दावा केला गेला. प्रथम दर्शनी चित्र असेच दिसले. पण, आज IPL नेच या वादावर पडदा पाडला आहे. आयपीएलने रोहितच्या विकेटचा व्हिडीओ पोस्ट केला अन् त्यात संजूचा हात बेल्सपासून बराच दूर असल्याचे स्पष्ट झाले. चेंडू बेल्सवरच हलका आदळल्याचेही यातून स्पष्ट दिसतेय...
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"