Rohit Sharma Arjun Tendulkar, IPL 2023: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघाने हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात विजय मिळवला. सुरूवातीचे दोन सामने हरल्यानंतर मुंबईने मंगळवारी विजयाची हॅटट्रिक केली. या विजयाचा हिरो ठरला कॅमेरॉन ग्रीन आणि अर्जुन तेंडुलकर. कॅमेरॉन ग्रीनने दमदार अर्धशतक ठोकले आणि दोन बळी टिपले. तर अर्जुनने अत्यंत दडपणाच्या वेळी शेवटचे षटक टाकत संघाला विजय मिळवून दिला. सामन्यात १९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, हैदराबादला १७८ धावांपर्यंतच पोहोचता आले. या सामन्यानंतर रोहित शर्मानेअर्जुन तेंडुलकरचे तोंडभरून कौतुक केले.
रोहितकडून अर्जुनवर स्तुतीसुमने
रोहित शर्मा म्हणाला- हैदराबादमध्ये खेळण्याच्या माझ्या अनेक आठवणी आहेत. मी हैदराबादच्या संघाकडून तीन वर्ष खेळलोय आणि ट्रॉफीही जिंकलोय. SRH विरूद्धच्या सामन्यात आम्हाला गोलंदाजांना नीट महत्त्व द्यायचे होते. आमच्या संघात असे काही गोलंदाज आहेत जे आधी IPL खेळलेले नाहीत, त्यामुळे त्यांना पाठिंबा देणं गरजेचं होतं. त्याचा फायदा काय झाला ते आपण अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीत पाहिले.
अर्जुनमध्ये आत्मविश्वास आहे
अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या संघात खेळत असल्याने एक वर्तुळ पूर्ण झालं असं मला वाटतं. अर्जुन गेली तीन वर्ष आमच्या संघाता भाग होता. मी त्याचं क्रिकेट बहरताना पाहिलं आहे. तो काय करू शकतो ते त्याला माहिती असतं आणि त्याबद्दल त्याला आत्मविश्वासही असतो. तो स्विंग गोलंदाजीही चांगली करतो आणि यॉर्कर देखील चांगले टाकतो. कोणत्या परिस्थितीत कसं खेळायचं किंवा कशा पद्धतीने गोलंदाजी करायची ते त्याला बरोब्बर माहिती आहे.
--
हाच असतो 'मुंबई इंडियन्स'चा प्लॅन
मी माझी फलंदाजी छान एन्जॉय करतो. मला फलंदाजीत जशी पद्धत आवडते तसा मी खेळतो. मला माझ्या संघाची जबाबदारी घ्यावी लागते पण मुंबईच्या संघात माझी भूमिका थोडी वेगळी आहे. आम्ही संघाला एक दमदार सुरूवात करून देण्याच्या विचारात असतो. आमच्यापैकी एकाने दीर्घकाळ बॅटिंग करायची आणि जमेल तेवढा मोठा स्कोअर करायचा असा आमचा प्लॅन आहे. आमच्याकडे मोठी बॅटिंग लाइन-अप आहे आणि त्यांना मु्क्तपणे बॅटिंग करायला मिळायला हवे अशी आमची अपेक्षा असते.
तिलक वर्माच्या बॅटिंगची प्रशंसा
तिलक वर्माच्या फलंदाजीची खरंच स्तुती केली पाहिजे. त्याचा खेळतानाचा अँटीट्यूड मला खूप आवडतो. तो गोलंदाज कोण आहे याकडे लक्ष देत नाही. तो कोणालाही घाबरून खेळत नाही. तो आलेल्या चेंडूचा विचार करतो आणि खेळतो, त्यामुळेच त्याला ते अधिक चांगले जमते.