इंडियन प्रीमिअर लीगच्या मागील ( IPL ) पर्वात चेन्नई सुपर किंग्सने ( CSK) पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. CSKच्या ताफ्यात कर्णधारबदलाची संगीतखूर्ची रंगली. आयपीएल २०२२ ला सुरुवात होण्याआधी महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ही जबाबदारी रवींद्र जडेजाच्या ( Ravindra Jadeja) खांद्यावर सोपवली गेली. ६-७ सामन्यानंतर पदरी अपयश पडल्यानंतर जडेजाकडून नेतृत्व काढून घेतले आणि पुन्हा धोनी फ्रेममध्ये आला. पण, त्यानंतर जडेजा नाराज असल्याचे जाणवले आणि त्याच्या कृतीतून ती नाराजी प्रकर्षाने समोर आली. त्याने CSK संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्या. त्यामुळे IPL 2023 मध्ये जडेजा चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings ) साथ सोडेल अशा चर्चा सुरू झाल्या आणि काल MS Dhoni ने याबाबतचा फैसलाच करून टाकला.
२००८मध्ये जडेजा राजस्थान रॉयल्सचा सदस्य होता. तेव्हा शेन वॉर्नने त्याला रॉकस्टार हे टोपण नाव दिले होते. २०१२च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सन ९.८ कोटींत त्याला आपल्या ताफ्यात घेतले आणि त्या लिलावातील तो महागडा खेळाडू ठरला होता. IPL 2022 च्या लिलावात जडेजाला १५ कोटींत CSK ने ताफ्यात कायम राखले आणि ही किंमत धोनीपेक्षाही अधिक आहे. जडेजाने २१० आयपीएल सामन्यांत २५०२ धावा व १३२ विकेट्स घेतल्या आहेत. पण, आता नाराज जडेजा वेगळ्या फ्रँचायझीकडून खेळणार असल्याची चर्चा आहे. दिल्ली कॅपिटल्स त्याला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक असल्याचेही सांगितले जातेय.
जडेजा कुठेच जाणार नसल्याचे CSK चे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन वारंवार सांगत असले तरी IPL 2023 साठीच्या मीनी ऑक्शनपर्यंत काय खरं, काय खोटं हे समजणे अवघड आहे. १५ नोव्हेंबर ही सर्व फ्रँचायझींना मीनी ऑक्शनसाठी खेळाडू रिलीज करण्याची अखेरची तारीख आहे. त्यात धोनीकडून जडेजाबाबत मोठं विधान समोर आलं आहे. सौराष्ट्रचा हा अष्टपैलू खेळाडू कुठेही जाणार नसल्याचे धोनीने सांगितले. CSK च्या संघ व्यवस्थापकांना धोनीने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जडेजाला रिलीज करू नका. तो संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे आणि त्याची जागा कुणीच घेऊ शकणार नाही. विशेषतः जेव्हा चेन्नई घरच्या मैदानावर खेळेल, तेव्हा जडेजा हवाच.
चेन्नई सुपर किंग्स ख्रिस जॉर्डन व एडम मिल्ने यांना रिलीज करण्याची शक्यता आहे.
ट्रेडिंग विंडो म्हणजे नेमकं काय?
- मिनी ऑक्शनपूर्वी ट्रेडिंग विंडो खुली होईल, ती जवळपास एका महिन्यासाठी खुली असेल
- आयपीएल २०२३च्या ट्रेडिंग विंडोमध्ये तीन खेळाडूंवर ट्रेड होईल, यातून एका फ्रँचायझीतील हव्या असलेल्या खेळाडूसाठी दुसरी फ्रँचायझी उत्सुकता दाखवू शकते
- BCCI यंदाच्या लिलावात राईट टू मॅच ( RTM) पुन्हा आणण्याच्या तयारीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"