Join us  

MS Dhoni च्या CSK ला मिळाला नवा 'चॅम्पियन'; जेमिसनच्या जागी संघात खेळणार!

डेल स्टेनने २ वर्षांपूर्वीच केली होती या खेळाडूबद्दलची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 12:55 AM

Open in App

CSK, IPL 2023: यंदाचा हंगाम सुरू होण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. स्पर्धेची सुरुवात 31 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील पहिल्या सामन्याने होईल. याआधी अनेक संघांना त्यांच्या काही खेळाडूंच्या दुखापतीमुळे अडचणींचा सामना करावा लागत असून नवीन खेळाडूंचा समावेश करावा लागत आहे. चेन्नई सुपर किंग्ज या स्पर्धेचा पहिला सामना खेळणार असून, संघात एका नवीन 'चॅम्पियन'चा समावेश करण्यात आला आहे. दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या काईल जेमिसनच्या जागी तो संघात खेळणार आहे.

चार वेळा IPL विजेतेपद पटकावणाऱ्या MS Dhoni च्या नेतृत्वाखालील CSK ने दक्षिण आफ्रिकेचा मध्यमगती गोलंदाज सिसांडा मगाला याला जेमिसनच्या जागी संघात स्थान दिले आहे. सीएसकेने रविवारी, १९ मार्च रोजी एका ट्विटद्वारे मगालाचा आपल्या संघात समावेश करण्याची घोषणा केली. मगालाने डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या लिलावात आपले नाव नोंदवले होते, परंतु त्यानंतर त्याला कोणताही खरेदीदार मिळाला नाही.

SA20 मध्ये चॅम्पियन

दक्षिण आफ्रिकेच्या नवीन T20 लीग SA20 मधील त्याच्या दमदार कामगिरीमुळेच त्याला CSK मध्ये स्थान मिळाले आहे. सनरायझर्स इस्टर्न केपकडून खेळणाऱ्या मगालाने या स्पर्धेतील 12 सामन्यात 14 बळी घेतले. तो सनरायझर्सचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. त्याच्या या कामगिरीमुळे सनरायझर्स पहिल्या सत्रातच चॅम्पियन बनले. मगालानेही अंतिम सामन्यात 30 धावांत 2 बळी घेतले. आता त्याला CSK मध्ये 50 लाखांच्या मूळ किमतीत जागा मिळाली आहे.

स्टेनने वर्तवली होती भविष्यवाणी

दक्षिण आफ्रिकेच्या महान वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या डेल स्टेनने स्वत:ला मगालाचा चाहता म्हणून घोषित केले हे सिसांडा मगलाची क्षमता सांगण्यासाठी पुरेसे आहे. 2 वर्षांपूर्वी जेव्हा मगाला दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळाले तेव्हा स्टेनने मगालाचे खुलेपणाने कौतुक केले होते. तेव्हाच तो म्हणाला होता की, आयपीएलच्या कोणत्याही संघातील गोलंदाज जखमी झाल्यास मगाला चांगला बदली खेळाडू ठरेल. आता २ वर्षांनंतर स्टेनचे म्हणणे खरे ठरले आहे.

2 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेसाठी पदार्पण

३२ वर्षीय मगालाने जानेवारीत इंग्लंडविरुद्धच्या वनडेत ३ विकेट्स घेतल्या होत्या. मगालाने २०२१ मध्येच दक्षिण आफ्रिकेसाठी वनडे आणि टी२० पदार्पण केले. त्याने आपल्या देशासाठी 5 एकदिवसीय सामन्यात 6 विकेट्स आणि 4 टी-20 मध्ये 3 बळी घेतले आहेत. टी-20 च्या एकूण रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर मगालाने 127 सामन्यात 136 विकेट्स घेतल्या आहेत. एवढेच नाही तर तो लोवर ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना मोठे फटके खेळण्याची क्षमताही राखतो. त्याने 123 च्या स्ट्राईक रेटने 735 धावा केल्या आहेत, ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२महेंद्रसिंग धोनीचेन्नईद. आफ्रिका
Open in App