Arjun Tendulkar Mumbai Indians, IPL 2023: दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी पदार्पण करण्यासाठी बराच काळ वाट पाहिली. अखेर ती गोष्ट न घडल्याने तो आता गोव्याच्या संघाकडून खेळतोय. त्याने गोव्याकडून खेळताना पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या डावात शतक झळकावून वडिलांच्या विक्रमाची बरोबरी केली होती. आता इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) मध्येही असेच काहीसे होताना दिसत आहे. अर्जुन तेंडुलकर ३ हंगामांपासून संघाचा भाग आहे, परंतु तो त्याच्या पदार्पणाची वाट पाहत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या या मोसमातील पहिल्या सामन्यातही संघाने अर्जुन तेंडुलकरला संधी दिली नाही.
अर्जुनला संधी न मिळणे विचित्र
कर्णधार रोहित शर्माच्या संघात अर्शद खान होता. त्याने ३ लिस्ट-ए सामन्यात ३ बळी घेतले होते. नेहल वढेरा आणि हृतिक शोकिनलाही स्थान मिळाले, पण अर्जुनला संघात जागा मिळालीच नाही. त्याशिवाय इम्पॅक्ट प्लेयरसाठी जाहीर झालेल्या खेळाडूंच्या यादीतही त्याला स्थान मिळू शकले नाही. चाहत्यांना हे थोडे विचित्र वाटले. अर्जुन हा सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे, पण त्याने काही काळ क्रिकेट खेळून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे तो चांगली कामगिरी करू शकत नाही असे थेट म्हणणे चुकीचे ठरले.
अहमदाबाद कसोटीत भारताविरुद्ध शतक झळकावणारा कॅमेरून ग्रीन कालच्या सामन्यात कधी आला आणि कधी निघून गेला हे कळलेच नाही. त्याने ५ धावा करताना ४ चेंडूंचा सामना केला. १७ कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेत टीममध्ये सामील झालेल्या ग्रीनची अवस्था पाहून लोक सोशल मीडियावर विचारू लागले की ग्रीनच्या ५ धावा चालतात, तर अर्जुनमध्ये काय कमी आहे?
मुंबई इंडियन्स सोडून निघून जा... चाहते भडकले!
अर्जुनचा मुंबई इंडियन्स संघात समावेश न केल्यामुळे चाहते या घटनेला महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या आदराशी जोडत आहेत. अर्जुनने मुंबई रणजी संघ ज्याप्रकारे सोडला होता, त्याप्रमाणे मुंबई इंडियन्स सोडला पाहिजे, असेही काहींचे मत आहे. त्यामुळेच असं झालं तर नवल वाटणार नाही.
पुढील सामन्यात अर्जुनला संधी मिळेल का?
गेल्या दोन मोसमात बेंचवर बसून संयमाची परीक्षा घेणाऱ्या अर्जुन तेंडुलकरसाठी मुंबई इंडियन्सच्या योजना काय आहेत हे फक्त कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक मार्क बाउचरच सांगू शकतील. पण पुढच्या सामन्यात त्याला खेळताना बघायचे आहे असा चाहत्यांचा सूर आहे. मात्र, अर्जुनला संधी मिळेल असे मुंबई इंडियन्सचा मूड पाहता दिसत नाही. अशा परिस्थितीत त्याला आणखी एक सामना बेंचवर बसूनच घालवावा तर आश्चर्य वाटणार नाही.