- रोहित नाईक
मुंबई : 'यंदाचे आयपीएल सत्र महेंद्रसिंग धोनीचे अखेरचे ठरणार, याबाबत काहीच ठामपणे सांगता येणार नाही. धोनीबाबत कोणताही अंदाज लावणे कठीण असून आपण त्याच्या खेळण्याविषयी केवळ अंदाजच लावू शकतो,' असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने 'लोकमत'ला सांगितले. शुक्रवारपासून आयपीएलच्या १६व्या सत्राला सुरुवात होत असून, गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स सलामी लढतीत भिडतील.
इरफानने सांगितले की, 'धोनी कधी कोणता निर्णय घेईल, हे कोणालाच माहीत नसते. नक्कीच यंदाच्या सत्रात त्याच्या आणि चेन्नईच्या कामगिरीबाबत माझी उत्सुकता आहे.' यंदाचे सत्र मुंबई इंडियन्ससाठी आव्हानात्मक ठरणार असल्याचे सांगताना इरफान म्हणाला, 'मुंबई इंडियन्सचे यश प्रामुख्याने फलंदाजांवर अवलंबून आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चरवर भार येणार असल्याची चर्चा आहे. परंतु, भार त्याच्यावर नसून फलंदाजांवर असेल. मुंबईच्या फलंदाजांना अतिरिक्त जबाबदारी घेऊन खेळावे लागेल. कारण, यंदा त्यांची गोलंदाजी फार मजबूत दिसत नाही.
बुमराह, झाय रिचर्ड्सन या दर्जेदार गोलंदाजांची कमतरता मुंबईला नक्की भासेल.'बीसीसीआय खेळाडूंचा शारीरिक थकवा जाणून घेण्यासाठी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. याआधीपासूनच याचा वापर होत असल्याचे इरफानने सांगितले. तो म्हणाला की, 'हे एक शानदार तंत्र असून खेळाडूंना याआधीपासूनच या तंत्रज्ञानाची माहिती आहे. यामध्ये खेळाडूंची शारीरिक क्षमता कळण्यास मोठी मदत होते. खेळाडूंची पूर्ण माहिती मिळत असल्याने ट्रेनर, फिजिओ यांना प्रत्येक खेळाडूची शारीरिक क्षमता ओळखता येते. दुखापतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे तंत्र खूप फायदेशीर ठरेल.'
तंदुरुस्ती राखण्याचे लक्ष्य!
मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी टी-२०चा खेळ तीन तासांचा असल्याने यामध्ये कार्यभाराचा प्रश्नच आला नाही पाहिजे, असे म्हटले होते. यावर इरफानने मत मांडले की, 'यंदा आयपीएल होम-अवे फॉर्मेटमध्ये खेळले जाणार आहे. खेळाडूंना सातत्याने प्रवासही करायचा आहे. त्यामुळे खेळ जरी तीन तासांचा असला, तरी सामने, सराव आणि प्रवास यांमध्ये ताळमेळ साधून तंदुरुस्ती राखण्याचे खेळाडूंपुढे आव्हान आहे. शेवटी प्रत्येक सामन्यात खेळाडूंना पूर्ण ताकदीनेच खेळायचे आहे.'
Web Title: IPL 2023: Mumbai Indians will have to work extra hard; Difficult to make any prediction about Dhoni- Irfan Pathan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.