Join us  

IPL 2023: नितीश राणा, रिंकू सिंहची झुंज व्यर्थ, अटीतटीच्या लढतीत सनरायझर्सची केकेआरवर मात 

IPL 2023, KKR Vs SRH Live Updates : आयपीएलमध्ये आज झालेल्या आणखी एका हायस्कोअरिंग सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईटरायडर्सवर २३ धावांनी मात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 11:17 PM

Open in App

आयपीएलमध्ये आज झालेल्या आणखी एका हायस्कोअरिंग सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईटरायडर्सवर २३ धावांनी मात केली. हैदराबादने दिलेल्या २२९ धावांच्या आव्हानाचा कोलकाता नाईटरायडर्सने कर्णधार नितीश राणा, नारायण जगदिशन आणि रिंकू सिंह यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर जोरदार पाठलाग केला. मात्र अखेरीस त्यांना विजयाने हुलकावणी दिली.   

हैदराबादने दिलेल्या २२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता नाईटरायडर्सची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात गुरबाझ भोपळाही न फोडता भुवनेश्वर कुमारची शिकार झाला. या धक्क्यातून केकेआरचा संघ सावरण्यापूर्वीच मार्को यान्सेनने चौथ्या षटकात व्यंकटेश अय्यर (१०) आणि सुनील नारायण (०) यांना पाठोपाठच्या चेंडूवर माघारी धाडले. त्यामुळे कोलाकात्याची अवस्था ३ बाद २० अशी झाली होती.

त्यानंतर नारायण जगदिशन, आणि कर्णधार नितीश राणा यांनी हैदराबादच्या गोलंदाजांवर जोरदार प्रतिहल्ला चढवला. दरम्यान, उमरान मलिकने टाकलेल्या सहाव्या षटकात नितीश राणाने २८ धावा कुटून काढल्या. राणा आणि जगदीशनने २९ चेंडूत ६२ धावांची भागीदारी केली. त्याचवेळी मयांक मार्कंडेयने जगदीशन (३६) आणि आंद्रे रसेल (३) यांना ठरावीक अंतराने बाद केले. त्यामुळे केकेआरची फलंदाजी पुन्हा एकदा बॅकफूटवर ढकलली गेली. 

मात्र एक बाजू लावून धरणाऱ्या कर्णधार नितीश राणाने  २५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने मागच्या सामन्यातील स्टार रिंकू सिंहच्या मदतीने झुंज सुरू ठेवली. मात्र वाढत असलेल्या अपेक्षित धावगतीचा सामना करणे त्यांना कठीण जात होते.  दरम्यान, शेवटच्या ५ षटकांत ८७ धावांची गरज असताना रिंकू सिंहने दोन षटकारांसह १७ धावा वसूल करून कोलकाता नाईटरायडर्सची आस जागवली. मात्र पुढच्याच षटकात नटराजने नितीश राणाची विकेट काढत कोलकात्याला मोठा धक्का दिला. राणा ४१ चेंडूत ७५ धावांची झुंजार खेळी करून माघारी परतला. त्यानंतर रिंकू सिंहने पुन्हा एकदा कमाल दाखवत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. पण अखेरीस कोलकाता नाईटरायडर्सला विजयासाठी २३ धावा कमी पडल्या. रिंकू सिंहने ३१ चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी केली.

तत्पूर्वी कोलकाता नाईटरायडर्सने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी बोलावल्यावर हॅरी ब्रुकचे तुफानी शतक, कर्णधार मार्क्रमची आक्रमक अर्धशतकी खेळी आणि अभिषेक शर्मा आणि क्लासेन यांनी शेवटच्या षटकांमध्ये केलेली तुफानी फटकेबाजी याच्या जोरावर हैदराबादने निर्धारित २० षटकांमध्ये ४ बाद २२८ धावा कुटून काढल्या. यंदाच्या हंगामात कुठल्याही संघाने रसलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. आता विजयासाठी कोलकाता नाईटरायडर्ससमोर २२९ धावांचे आव्हान ठेवले होते.

ब्रुकने ५५ चेंडूत नाबाद १०० धावा ठोकत हैदराबादला निर्धारित २० षटकांमध्ये ४ बाद २२८ धावांपर्यंत मजल मारून दिली, कोलकात्याकडून रसेलने ३ बळी टिपले. तर वरुण चक्रवर्तीला एक विकेट मिळाली.    

टॅग्स :आयपीएल २०२३सनरायझर्स हैदराबादकोलकाता नाईट रायडर्स
Open in App