Join us  

IPL 2023 : १० वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर, आता रोहितने दिली संधी, मुंबई हरली पण त्याने चमक दाखवली

Mumbai Indians: बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने एका अशा गोलंदाजाला संधी दिली जो गेल्या १० वर्षांमध्ये भारतासाठी एकही सामना खेळला नव्हता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 6:30 PM

Open in App

आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूक़डून पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात मुंबईची आघाडीची फळी पूर्णपणे कोलमडली होती. तर गोलंदाजांनाही फारशी कमाल दाखवता आली नव्हती. फॅफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी मुंबईच्या गोलंदाजांना झोडपून काढले. दरम्यान, या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने एका अशा गोलंदाजाला संधी दिली जो गेल्या १० वर्षांमध्ये भारतासाठी एकही सामना खेळला नव्हता. विराट आणि डू प्लेसिसने मुंबईच्या इतर गोलंदाजांची पिटाई केली. मात्र रोहितने दिलेली संधी सार्थ ठरवत या गोलंदाजाने किफायतशीर मारा केला. 

या गोलंदाजाचं नाव आहे पीयूष चावला. रोहित शर्माने मुंबईविरुद्धच्या लढतीसाठी पीयूष चावला याला संघात स्थान दिले. त्याने डिसेंबर २०१२ नंतर भारतीय संघाकडून एकही सामना खेळलेला नाही. मात्र रोहित शर्मान त्याच्यावर विश्वास दर्शवला. पीयूष चावलानेही रोहित शर्माने दर्शवलेला विश्वास सार्थ ठरवला. पीयूष चावलाला सामन्यात एकही विकेट मिळाला नाही. मात्र त्याने किफायतशीर गोलंदाजी करताना ४ षटकांमध्ये केवळ २६ धावा दिल्या. पीयूष चावला २०२१ मध्ये मुंबईकडून खेळला होता. मात्र २०२२ मध्ये त्याला कुठल्याही संघाने खरेदी केले नव्हते. 

पीयूष चावला २००८ ते २०१३ या काळात पंजाबच्या संघात होता. तर २०१४ ते २०१९ या काळात तो कोलकाता नाईटरायडर्सकडून खेळला होता. २०२० मध्ये तो चेन्नई सुपरकिंग्सच्या संघात होता. तर २०२१ मध्ये तो मुंबईकडून खेळला होता. आता पुन्हा एकदा तो मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसत आहे. 

२०११ मध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघात पीयूष चावलाचा समावेश होता. पीयूष चावलाने टीम इंडियाकडून आतापर्यंत ३ कसोटी २५ वनडे आणि ७ टी-२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने अनुक्रमे कसोटीत ७, वनडेत ३२ आणि टी-२० मध्ये ४ विकेट्स टिपले आहेत. पीयूष चावलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी संधी मिळाली नसली तरी त्याने आयपीएलमध्ये आपल्या फिरकीची छाप पाडली आहेत. त्याने आयपीएलमध्ये १६० हून अधिक बळी टिपले आहेत.  

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सरोहित शर्मा
Open in App