IPL 2023, Punjab Kings vs Delhi Capitals Live Marathi : प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झालेल्या दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मोठा अपसेट नोंदवला. २१३ धावांचा डोंगर उभारल्यानंतर DCच्या गोलंदाजांनी पंजाब किंग्सला सुरुवातीलाच धक्के दिले. क्षेत्ररक्षणात त्यांच्याकडून झालेल्या चुका DCला महागात पडल्या असत्या, परंतु नशीबाने आज त्यांची साथ दिली. लिएम लिव्हिंगस्टोन आणि अथर्व तायडे यांना प्रत्येकी एक झेल व एक रन आऊट करण्याची संधी DCने गमावलेली. लिव्हिंगस्टोनने त्याचाच फायदा उचलताना अखेरपर्यंत DCला तव्यावर ठेवले होते, परंतु दुसऱ्या बाजूने त्याला साथ न मिळाल्याने पंजाबचा पराभव झाला. लिव्हिंगस्टोन ९४ धावांवर झेलबाद झाला.
इशांत शर्माने त्याच्या पहिल्याच षटकात शिखर धवनची ( ०) विकेट घेतली आणि प्रभसिमरन सिंगला ( २२) अक्षर पटेलने बाद केले. लिएम लिव्हिंगस्टोन व अथर्व तायडे यांचा प्रत्येकी एक झेल अन् प्रत्येकी रन आऊट करण्याची संधी दिल्लीच्या खेळाडूंनी गमावली. हे दोन्ही झेल कुलदीप यादवच्या षटकात सोडले गेले आणि अशी फिल्डिंग पाहून कोच रिकी पाँटिंग संतापले. १० षटकांत पंजाबच्या २ बाद ७२ धावा झालेल्या आणि त्यांना अखेरच्या ६० चेंडूंत १३९ धावा करायच्या होत्या. एवढे जीवदान मिळाल्यानंतर PBKSचे खेळाडू सुसाट सुटले आणि दोघांनी अर्धशतक झळकावले. ४२ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५५ धावा करणारा अथर्व १५व्या षटकात रिटायर्ड हर्ट झाला. त्याने लिव्हिंगस्टोनसह ५० चेंडूंत ७८ धावा जोडल्या.
पंजाबला ३० चेंडूंत ८६ धावा करायच्या होत्या आणि लिव्हिंगस्टोनला साथ द्यायला जितेश शर्मा आला आणि भोपळ्यावर त्याचा खलिल अहमदने झेल घेतला. पण, लिव्हिंगस्टोन शड्डू ठोकून उभा राहिला आणि त्याने ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. २४ चेंडूंत ७४ धावा हव्या असताना शाहरूख खान त्याच्या सोबतीला आला, परंतु तोही मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात खलिलला विकेट देऊन बसला. मात्र, खलिलच्या त्या षटकात लिव्हिंगस्टोनने २० धावा चोपल्या. लिव्हिंगस्टोन DCच्या गोलंदाजांना जुमानत नव्हता आणि त्याचा प्रत्येक फटका चाहत्यांचा उत्साह वाढवणारा ठरला. सॅम करन आणि त्याने १८व्या षटकात मुकेश कुमारला २१ धावा चोपल्या आणि आता १२ चेंडूंत ३८ धावा असा सामना पंजाबच्या बाजूने झुकला.
एनरिच नॉर्खियाच्या पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर करन ( ११) त्रिफळाचीत झाला. पुढच्या चेंडूवर एक धाव घेण्याच्या प्रयत्नात हरप्रीत ब्रार रन आऊट झाला. नॉर्खियाच्या १९व्या षटकात दोन विकेट्स मिळवल्या अन् फक्त ५ धावा दिल्या. ६ चेंडूंत ३३ धावा असा सामना फिरला. इशांतच्या ३ चेंडूंत १७ धावा आल्या.. तिसरा चेंडू नो बॉल पडल्याने आता ३ चेंडूंत १६ धावा पंजाबला करायच्या होत्या, परंतु फ्रि हिटचा फुलटॉस लिव्हिंगस्टोनने मिस केला. लिव्हिंगस्टोन ४८ चेंडूंत ५ चौकार व ९ षटकारांसह ९४ धावांवर झेलबाद झाला अन् पंजाबला ८ बाद १९८ धावा करता आल्या.
तत्पूर्वी, डेव्हिड वॉर्नर ( ४६) व पृथ्वी शॉ ( ५४) यांच्या फटकेबाजीनंतर रायली रूसोचे वादळ धर्मशालावर घोंगावले आणि त्याला फिल सॉल्टची मदत मिळाली. पृथ्वीने वॉर्नरसह ९४ धावा चोपल्या. त्यानंतर रूसो आणि पृथ्वी यांनीही २८ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी केली. रूसो व सॉल्ट यांनी ३० चेंडूंत ६५ धावा केल्या. रूसोने ३७ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ८२ धावा केल्या. सॉल्ट नाबाद २६ धावा केल्या आणि दिल्लीने २० षटकांत २ बाद २१३ धावांचा डोंगर उभा केला.
Web Title: IPL 2023, PBKS vs DC Live Marathi : Delhi Capitals registered big upset, beat Punjab Kings by 15 runs, PBKS playoff hopes dashed
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.