IPL 2023, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : मुंबई इंडियन्सच्या सर्व फलंदाजांनी आज अर्शदीप सिंगला ( Arshdeep Singh) टार्गेट केले होते. पंजाब किंग्सच्या गोलंदाजाने वानखेडेवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात 'यष्टीतोड' गोलंदाजी करून यजमानांच्या तोंडचा घास पळवला होता. आज त्याचा वचपा काढण्यासाठीच मुंबई इंडियन्स मोहालीत दाखल झाले होते. अर्शदीपने मुंबईत तिलक वर्माचा ( Tilak Verma) यष्टींचे दोन तुकडे केले होते आणि आज त्याचा बदला MIच्या फलंदाजाने घेतला. अर्शदीपच्या ४ षटकांत ६६ धावांचा पाऊस पाडला गेला.
सूर्यकुमार यादव, इशान किशनची 'तोडफोड' फलंदाजी, मुंबई इंडियन्सची 'व्याजासकट' वसूली
शिखर धवन ( ३०) आणि मॅथ्यू शॉर्ट ( २७) यांनी ४९ धावांची भागीदारी करून पंजाबचा पाया सेट केला. त्यानंतर जितेश शर्मा व लिएम लिव्हिंगस्टोनने वादळी खेळी केली. जितेश २७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४९ धावांवर नाबाद राहिला. लिव्हिंगस्टोनने ४२ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८२ धावा केल्या व जितेशसोबत ५३ चेंडूंत ११९ धावांची भागीदारी केली. पंजाबने ३ बाद २१४ धावा केल्या. रोहित शर्मा शून्यावर माघारी परतल्यानंतर इशान किशन व इम्पॅक्ट प्लेअर सूर्यकुमार यादव यांनी मोहालीत वादळ आणले. इशान व कॅमेरून ग्रीन ( २३) यांनी ५४ धावांची भागीदारी करून त्यासाठी पाया रचला.
इशान व सूर्याने चौफेर फटकेबाजी करातना ५५ चेंडूंत ११६ धावांची भागीदारी केली. सूर्याने ३१ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६६ धावा, तर इशानने ४१ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह ७५ धावा केल्या. अर्शदीपच्या षटकातील तिलक वर्माने पहिला चेंडू सावध खेळून काढल्यानंतर ६,४,६ असे खणखणीत फटके खेचून सर्व दडपण झुगारून दिले. तिथेच मॅच मुंबईच्या हातात आली. मुंबईने १८.५ षटकांत ४ बाद २१६ धावा करून सामना जिंकला. डेव्हिड २६ व तिलक १९ धावांवर नाबाद राहिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"