IPL 2023, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : पंजाब किंग्सने मुंबईत येऊन मुंबई इंडियन्सवर थरारक विजयाची नोंद केली होती. अर्शदीप सिंगच्या 'यष्टितोड' गोलंदाजीने वानखेडेवर मुंबईला हार मानावी लागली होती. आज त्या पराभवाची मुंबईने सव्याज परतफेड केली. पंजाब किंग्सने विजयासाठी ठेवलेले २१५ धावांचे लक्ष्य MI ने सहज पार केले. सूर्यकुमार यादव ( Suryakumar yadav) आणि इशान किशन ( Ishan Kishan) यांचे मोहालीत वादळ घोंगावले. त्यांच्या फटकेबाजीने PBKS चे गोलंदाज लाईन लेंथ विसरलेले दिसले. प्रत्येक चेंडू हा सीमारेषेला चुंबन घेताना दिसला. तिलक वर्मा व टीम डेव्हिडने मॅच फिनिश केली. अर्शदीपने आज ३.५ षटकांत ६६ धावांत १ विकेट घेतली. तो महागडा गोलंदाज ठरला.
तगडे लक्ष्य समोर असताना रोहित शर्माने तिसराच चेंडू हवेत उडवला, परंतु मॅथ्यू शॉर्ट झेल घेण्यासाठी सज्ज होता. रिषी धवनने हिटमॅनला भोपळ्यावर माघारी पाठवले. रोहित आयपीएलमध्ये सर्वाधिक १५ वेळा शून्यावर बाद झाला आहे आणि त्याने दिनेश कार्तिक, सुनील नरीन व मनदीप सिंग यांच्या नावावर असलेल्या नकोशा विक्रमाशी बरोबरी केली. त्यानंतर इशान किशन व कॅमेरून ग्रीन यांनी अर्धशतकी भागीदारी करताना पॉवर प्लेमध्ये ५४ धावा करून दिल्या. सहाव्या षटकात नॅथन एलिसच्या गोलंदाजीवर ग्रीन ( २३) झेलबाद झाला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सूर्यकुमार यादव मैदानावर उतरला. सूर्या व इशान या जो़डीने पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना २९ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली.
१४व्या षटकात सूर्यकुमार यादवने ६,६,४,४ असे सॅम करनचे स्वागत केले. त्याने यासह २३ चेंडूंत यंदाच्या आयपीएलमधील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. इशाननेही २९ चेंडूंत पन्नास धावा केल्या. सूर्या आज वेगळ्याच अंदाजात खेळला.. त्याने सुपला, झोपला असे भात्यात नसलेलेही फटके खेचून MI ला १४ षटकांत १४९ धावांपर्यंत पोहोचवले अन् आता अखेरच्या सहा षटकांत ६६ धावा हव्या होत्या, ज्या सहज शक्य होत्या. या दोघांनी ५५ चेंडूंत ११६ धावांची भागीदारी करून MI ला विजयाच्या उंबरठ्यावर बसवले. पण, नॅथन एलिसने टाकलेल्या १६व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सूर्या बाद झाला. त्याने ३१ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६६ धावांची खेळी केली. अर्शदीपने शॉर्ट थर्डला मस्त झेल घेतला. एलिसने ३४ धावांत २ विकेट्स घेतल्या.
टीम डेव्हिड व इशानला ३० चेंडूंत ४५ धावा करायच्या होत्या आणि सामना मुंबईच्या पारड्यातच दिसत होता. पण, पुढच्या षटकात अर्शदीपने संथ बाऊन्सर टाकून इशानला चूक करण्यास भाग पाडले. इशान ४१ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह ७५ धावांवर माघारी परतला. पण, तिलक वर्माने पहिला चेंडू सावध खेळून काढल्यानंतर ६,४,६ असे खणखणीत फटके खेचून सर्व दडपण झुगारून दिले. १८ चेंडूंत २१ धावा असताना टीम डेव्हिडने चतुराईने चौकार मिळवला. मुंबई इंडियन्सने १८.५ षटकांत ४ बाद २१६ धावा करून सामना जिंकला. डेव्हिड २६ व तिलक १९ धावांवर नाबाद राहिलेय
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने पियूष चावला ( २-२९) च्या जोरावर पंजाब किंग्सला सुरूवातीला धक्के दिले, परंतु त्यांच्या अन्य गोलंदाजांना अपयश आले. PBKS च्या जितेश शर्मा व लिएम लिव्हिंगस्टोन यांनी MIच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले. प्रभसिमरन सिंग ( ९) लगेच माघारी परतल्यानंतर शिखर धवन ( ३०) आणि मॅथ्यू शॉर्ट ( २७) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३५ चेंडूंत ४९ धावांची भागीदारी केली. जितेश २७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४९ धावांवर नाबाद राहिला. लिव्हिंगस्टोनने ४२ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८२ धावा केल्या व जितेशसोबत ५३ चेंडूंत ११९ धावांची भागीदारी केली. पंजाबने ३ बाद २१४ धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, PBKS vs MI Live Marathi : Ishan Kishan scored 75 in 41 balls with 7 fours and 4 sixes, suryakumar yadav 66 (31), MUMBAI INDIANS HAVE SUCCESSFULLY CHASED DOWN 215 IN MOHALI.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.