Join us  

IPL 2023: कामगिरी करणारे खेळाडू आयपीएलमध्ये टिकतील - राशिद खान

IPL 2023: ‘विदेशी लीगमध्ये शानदार कामगिरी करणारे खेळाडू आयपीएलमध्ये स्थान तर मिळवतात, पण कामगिरीत सातत्य असेल तरच या लीगमध्ये निभाव लागू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 4:25 AM

Open in App

अहमदाबाद : ‘विदेशी लीगमध्ये शानदार कामगिरी करणारे खेळाडू आयपीएलमध्ये स्थान तर मिळवतात, पण कामगिरीत सातत्य असेल तरच या लीगमध्ये निभाव लागू शकतो. स्वत:ला चर्चेत ठेवायचे झाल्यास सतत कामगिरीची चुणूक दाखविणे गरजेचे ठरते,’ असे मत जागतिक टी-२० क्रमवारीत नंबर वन गोलंदाज असलेला अफगाणिस्तानचा स्टार राशिद खान याने गुरुवारी व्यक्त केले.

राशिद हा गुजरात टायटन्सचा उपकर्णधार आहे. २०२३ च्या आयपीएल सत्रात हॅट्ट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ९७ सामने खेळून १२३ गडी बाद केले आहेत. विदेशी खेळाडूने आयपीएलचे शंभर सामने खेळणे विशेष ठरते. हा अनुभव कसा होता, असे विचारताच राशिद म्हणाला, ‘सुरुवातीची पाच वर्षे मी सनरायझर्ससाठी खेळलो. आता गुजरात संघात आहे. आयपीएलमध्ये स्वत:ची उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी कर्तृत्व पणाला लावणे गरजेचे ठरते.’ 

इम्पॅक्ट प्लेअरमुळे अष्टपैलूचे स्थान धोक्यात आले असे वाटते का? यावर राशिद म्हणतो, ‘होय, मला असे वाटू लागले आहे. बॅटिंग ऑलराउंडरला बॅटिंगमध्ये ७० तर बॉलिंगमध्ये ३० टक्के तर बॉलिंग ऑलराउंडरला बॉलिंगमध्ये ७० आणि बॅटिंगमध्ये ३० टक्के योगदान द्यावेच लागेल. थोडी फलंदाजी आणि थोडीफार गोलंदाजी, असे चालणार नाही.’   

टी-२० गोलंदाजी क्रमवारीत टॉप टेनमध्ये अफगाण संघातील तीन खेळाडू आहेत. यावर मत विचारताच राशिद म्हणाला, ‘‘तीनपैकी एक वेगवान गोलंदाज फजल हक फारूकी आहे. अफगाण क्रिकेटसाठी हे चांगले संकेत असावेत.  आमचे फिरकी आणि वेगवान गोलंदाज भेदक बनत आहेत. नवीन उल हक हा झपाट्याने पुढे आला आहे.’’

अफगाणिस्तानला जुलैमध्ये भारताचा दाैरा करायचा आहे. याविषयी विचारताच राशिद म्हणाला, ‘‘भारतात भारताविरुद्ध खेळणे म्हणजे युवा खेळाडूंना शिकण्याची संधी असते.  आम्ही येथे पहिली कसोटी खेळलो. त्याचा मोठा लाभ झाला. 

‘होम-अवे’मुळे स्थानिक संघाला लाभ होत नाही? असे विचारताच राशिद म्हणाला, ‘आधी संघ सेट झाले होते. सध्या संघात बदल झाले. नव्या चेहऱ्यांना स्थानिक परिस्थितीशी एकरूप होण्यास वेळ लागतो. हवामानाशीदेखील सांगड घालावी लागेल. २-३ वर्षांनंतर मात्र सर्वच संघ स्थानिक मैदानावर चांगली कामगिरी करू शकतील.’

टॅग्स :आयपीएल २०२३गुजरात टायटन्स
Open in App