IPL 2023 Play Offs Scenario : गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावला. गतविजेत्यांनी घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजयाची नोंद केली. १३ सामन्यांत १८ गुणांसह GT प्ले ऑफसाठी पात्र ठरले अन् त्यांनी क्वालिफायर १ मधील स्थानही पक्के केले आहे. आता उर्वरित तीन जागांसाठी चांगली स्पर्धा आहे.
३ जागा अन् ७ स्पर्धक गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स ( १५), मुंबई इंडियन्स ( १४) व लखनौ सुपर जायंट्स ( १३) हे सध्या टॉप चौघांत आहेत... चेन्नईचा एक सामना शिल्लक आहे आणि तो जिंकून तेही क्वालिफायर १ साठी पात्र ठरू शकतात. मुंबईला उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत आणि लखनौलाही दोन सामने जिंकावे लागतील. मुंबई व लखनौ यांना दोन विजय मिळवण्यात यश आल्यास चित्र स्पष्टच होईल.
पण, यापैकी एकही संघ पराभूत झाला, तर RCB, RR, KKR व PBKS या प्रत्येकी १२ गुण असलेल्या संघांना संधी मिळू शकते. मुंबई व लखनौ यांनी दोन्ही सामने गमावले तर प्ले ऑफची चुरस अधिक रंजक होईल. RR व KKR यांचा केवळ एक सामना शिल्लक असल्याने त्यांना विजयासह नेट रन रेटवर अवलंबून रहावे लागेल. RCB व PBKS यांचे दोन सामने शिल्लक आहेत आणि ते जिंकून त्यांना १६ गुणांसह प्ले ऑफ गाठण्याची संधी आहे.