IPL 2023 Play Offs Scenario : पंजाब किंग्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज दिल्ली कॅपिटल्सकडून हार पत्करावी लागली. प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी पंजाबला उर्वरित दोन सामने जिंकणे महत्त्वाचे होते, परंतु त्यापैकी एक सामना त्यांनी गमावला. त्यामुळे आता लखनौ सुपर जायंट्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यासाठी काम सोपे झाले आहे. पंजाबने शेवटची साखळी मॅच जिंकली, तरी त्यांचे १४ गुण होतील. सध्या गुजरात टायटन्स ( १८) प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि LSG प्रत्येकी १५ गुणांसह आघाडीवर आहेत.
पंजाब किंग्सचा शेवटचा साखळी सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध आहे आणि संजू सॅमसनच्या संघालाही विजय मिळवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा सामना चुरशीचा होणे अपेक्षित आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला उर्वरित दोन सामन्यांत सनरायझर्स हैदराबाद व गुजरात टायटन्स ( गतविजेते प्ले ऑफमध्ये दाखल) यांच्याविरुद्ध खेळायचे आहे. हे दोन्ही सामने त्यांनी जिंकल्यास प्ले ऑफची शर्यत रंजक होईल. चेन्नई सुपर किंग्स व लखनौ सुपर जायंट्स यांचे प्रत्येकी १५ गुण आहेत. CSK विरुद्ध DC आणि LSG विरुद्ध KKR या लढतीवर सर्व गणित अवलंबून असणार आहे.
RCB ने उर्वरित दोन आणि मुंबई इंडियन्सने शेवटची मॅच जिंकल्यास त्यांचे प्रत्येकी १६ गुण होतील. पण, त्याआधी CSK ( vs DC) आणि LSG ( vs KKR) यांनी त्यांचा शेवटचा साखळी सामना जिंकला, तर MI व RCB यांच्यापैकी ज्याचा नेट रन रेट जास्त तो प्ले ऑफमध्ये चौथ्या क्रमांकासाठी पात्र ठरेल. मुंबईने मात्र शेवटची मॅच गमावली अन् RCB ने दोन्ही सामने जिंकले, तर ते प्ले ऑफ खेळतील.