IPL 2023 Points Table: गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने बाजी मारताना राजस्थान रॉयल्सला १० धावांनी नमवले. यासह लखनऊ गुणतालिकेत दुसरे स्थान कायम राखले. राजस्थान अव्वल स्थानी कायम असून दोन्ही संघांचे ८ गुण आहेत. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर लखनऊ २० षटकांत ७ बाद १५४ धावा केल्या. यानंतर लखनऊ राजस्थानला २० षटकांत ६ बाद १४४ धावांवर रोखले. आवेश खान आणि मार्कस स्टोइनिस यांनी मोक्याच्यावेळी बळी घेत लखनऊला विजयी केले.
राजस्थान विरुद्ध लखनऊच्या सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठे बदल झाले आहे. राजस्थान रॉयल्स ६ सामन्यात ४ विजय मिळवत ८ गुणांसह गुणतालिकेत अजूनही अव्वल स्थानी कायम आहे. तर लखनऊ सुपर जायट्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. लखनऊनेही ६ सामन्यात ४ विजय मिळवले आहेत. चेन्नई सुपरकिंग्स तिसऱ्या क्रमांकावर असून गुजरात टायटन्स चौथ्या क्रमांकावर आहे.
पंजाब किंग्स पाचव्या स्थानी आहे. तर मुंबई इंडियन्स सहाव्या स्थानी आहे. कोलकाता नाईट रायडर्स सातव्या स्थानी असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आठव्या क्रमांकावर आहे. सनराजर्स हैदराबाद नवव्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सने ५ पैकी एकही सामना जिंकलेला नाही, त्यामुळे गुणतालिकेत दिल्लीचा संघ शेवटच्या म्हणजेच दहाव्या स्थानी आहे.
ऑरेंज कॅप-
फॅफ ड्यू प्लेसिस ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल क्रमांकावर आहे. ड्यू प्लेसिसने आतापर्यंत ५ सामन्यात २५९ धावा केल्या आहेत. जोस बटलर दुसऱ्या क्रमांकावर आहे. बटलरने ६ सामन्यात २४४ धावा केल्या आहेत. व्यंकटेश अय्यर तिसऱ्या क्रमांकावर आहे. अय्यरने मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावण्याची अप्रतिम कामगिरी केली. वेंकटेशने आतापर्यंत ५ सामन्यात २३४ धावा केल्या आहेत. शिखर धवन चौथ्या क्रमांकावर आहे. धवनने ४ सामन्यात २३३ धावा केल्या आहेत. यानंतर शुभमन गिल पाचव्या क्रमांकावर आहे. गिलने ५ सामन्यात २२८ धावा केल्या आहेत.
पर्पल कॅप-
पर्पल कॅपसाठी युझवेंद्र चहल आणि मार्क वुड यांच्यात चुरशीची लढत होत आहे. वुडने ४ सामन्यात ११ विकेट्स घेतल्या आहेत, तर चहलने ६ सामन्यात ११ विकेट्स घेतल्या आहेत. राशिद खाननेही ५ सामन्यात ११ विकेट्स घेतल्या आहेत. शमीने ५ सामन्यात १० बळी घेतले आहेत. तर तुषार देशपांडेच्या नावावर आतापर्यंत ५ सामन्यात १० बळी आहेत.