सलग चार पराभवानंतर कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला बुधवारी त्यांच्या घरच्या मैदानावर २१ धावांनी पराभूत करीत आयपीएल २०२३ मध्ये प्ले ऑफची आशा कायम राखली आहे. विजयामुळे नितीश राणाच्या नेतृत्वाखालील केकेआर संघ सहा गुणांसह सातव्या स्थानावर आला. बंगळुरू संघ आठ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. वरुण चक्रवर्ती सामनावीर ठरला. चिन्नास्वामीवर केकेआरने नाणेफेक गमावल्यानंतर २० षटकांत ५ बाद २०० धावा उभारल्या. बंगळुरूला २० षटकांत बाद १७९ पर्यंतच मजल गाठता आली.
बंगळुरुविरुद्ध कोलकाताच्या सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठे बदल झाले आहे. गुणतालिकेत चेन्नई सुपरकिंग्स १० गुणांसह अजूनही अव्वल स्थानी आहे. तर गुजरात टायटन्स १० गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. राजस्थान रॉयल्स तिसऱ्या स्थानी, तर लखनौ चौथ्या स्थानी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पाचव्या क्रमांकावर असून पंजाब किंग्स सहाव्या क्रमांकावर आहे. तर काल मिळवलेल्या विजयानंतर कोलकाता नाइट रायडर्स सातव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स अजूनही आठव्या क्रमांकावर असून सनराइस हैदराबाद नवव्या आणि दिल्ली कॅपिटल्स दहाव्या क्रमांकावर आहे.
आज चेन्नईविरुद्ध राजस्थान
मागच्या दोन सामन्यांत पराभूत झालेला राजस्थान रॉयल्स घरच्या मैदानावर गुरुवारी चेन्नई सुपरकिंग्जला नमविणार का? तीन विजय नोंदवून येथे दाखल झालेल्या महेंद्रसिंग धोनीच्या संघाला नमविणे संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील रॉयल्सला वाटते तितके सोपे राहणार नाही.