थरारक झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने केवळ ५ धावांनी बाजी मारत राजस्थान रॉयल्सचे तगडे आव्हान परतावले. यासह यंदाच्या आयपीएलमधील सलग दुसऱ्या विजयासह पंजाबने गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. पंजाबने २० षटकांत ४ बाद १९७ धावा उभारल्या. यानंतर त्यांनी राजस्थानला २० षटकांत ७ बाद १९२ धावांवर रोखले.
वेगवान गोलंदाज नॅथन एलिसचा भेदक मारा पंजाबसाठी महत्त्वाचा ठरला. त्याने ३० धावांत ४ बळी घेत पंजाबला वर्चस्व मिळवून दिले. राजस्थानच्या मधल्या फळीने सांघिक खेळ केला. कर्णधार संजू सॅमसन, शिमरोन हेटमायर व इम्पॅक्ट खेळाडू ध्रुव जुरेल यांच्यामुळे राजस्थानच्या विजयाच्या आशा निर्माण झाल्या होत्या. हेटमारयर-जुरेल यांनी सातव्या गड्यासाठी २६ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी करत सामन्यात रंग भरले. अखेरच्या षटकात हेटमायर धावबाद झाला आणि पंजाबने बाजी मारली.
तत्पूर्वी, कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग या सलामीवीरांनी राजस्थानच्या गोलंदाजांविरुद्ध जबरदस्त 'हल्लाबोल' करत पंजाबला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. दोघांनी पॉवर प्लेच्या ६ षटकांमध्येच ६३ धावांचा चोप दिला. दोघांनी ५८ चेंडूंत १० धावांची सलामी देत पंजाबला शानदार सुरुवात करून दिली. अखेर दहाव्या षटकात जेसन होल्डरने प्रभसिमरनला बाद केले. जोस बटलरने सीमारेषेवरून धावत येत, अप्रतिम सूर मारत प्रभसिमरनचा झेल घेतला. यानंतर लगेच भानुका राजपक्ष दुखापतग्रस्त झाल्याने मैदानाबाहेर गेला. यामुळे राजस्थान पुनरागमन करेल, असे वाटले; परंतु धवनने यंदाच्या सत्रातील पहिले अर्धशतक झळकावत संघाला भक्कम स्थितीत आणले
पंजाबच्या या विजयामुळे आयपीएल गुणतालिकेमध्ये मोठा बदल झाला आहे. गुजरात २ सामने जिंकत अजूनही पहिले स्थान कायम टिकवले आहे. तर पंजाबने राजस्थानविरुद्धचा सामना जिंकत दूसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची तिसऱ्या स्थानी घसरण झाली असून राजस्थान रॉयल्स संघ चौथा स्थानावर आहे. लखनऊ सुपरजायंट्स पाचव्या स्थानावर, तर चेन्नई सुपर किंग्ज सहाव्या स्थानवर आहे. सातव्या स्थानावर कोलकात नाइट राइडर्स, आठव्या स्थानावर दिल्ली कॅपिटल, नवव्या स्थानावर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद दहाव्या क्रमांकावर आहे.
ऑरेंज कॅप-
पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात शानदार ८६ धावा केल्या आणि १२६ धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. सध्या ऑरेंज कॅप चेन्नई सुपर किंग्जचा ऋतुराज गायकवाड यांच्याकडे आहे. त्याने आतापर्यंत २ सामन्यात १४९ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर लखनऊ सुपरजायंट्स काईल मेयर आहे ज्याने २ सामन्यात १२६ धावा केल्या आहेत. त्याचवेळी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने २ सामन्यात ९७ धावा केल्या आहेत. सॅमसन ऑरेंज कॅप मिळवण्याच्या शर्यतीत चौथ्या क्रमांकावर आला आहे.
पर्पल कॅप-
लखनऊ सुपरजायंट्स संघाचा गोलंदाज मार्क वुडकडे सध्या ८ विकेट्ससह पर्पल कॅप आहे. दुसऱ्या क्रमांकावर राशिद खान आहे, ज्याच्या नावावर ५ विकेट आहेत. रवी बिश्वोईने २ सामन्यात ५ विकेट घेतल्या असून तो सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Web Title: IPL 2023 Points Table: Punjab jump straight to second place; Gujarat remains at the first position, see IPL Points Table
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.