IPL 2023 Points Table Update after RCB vs LSG: यंदा स्पर्धेत एकूण 43 सामने खेळले गेले आहेत आणि येथून प्लेऑफची शर्यत खूपच मनोरंजक दिसत आहे. सोमवारी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध आरसीबीने मिळवलेल्या विजयामुळे आयपीएलचा हा मोसम आणखी रोमांचक झाला आहे. आता गुणतालिकेत क्रमांक दोन ते सहाव्या क्रमांकावर असे पाच संघ आहेत ज्यांनी प्रत्येकी पाच सामने जिंकून 10-10 गुण मिळवले आहेत. म्हणजेच यावेळी शेवटच्या टप्प्यात नेट रनरेटची अत्यंत महत्त्वाची भूमिका पाहायला मिळेल.
RCB टॉप-५ मध्ये!
RCB ने कमी धावसंख्येच्या सामन्यात विजय मिळवला. या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सचा संघ दुसऱ्या क्रमांकावरून एका स्थानाने खाली घसरला आहे. दुसरीकडे, आरसीबीने जोरदार उसळी घेत पुन्हा टॉप-5मध्ये स्थान मिळवले. गुजरात, राजस्थान, लखनौ आणि चेन्नई अजूनही टॉप-4 मध्ये आहेत. पण गमतीची गोष्ट म्हणजे दुसऱ्या क्रमांकापासून सहाव्या क्रमांकापर्यंतच्या सर्व संघांचे 10-10 गुण आहेत. अशा परिस्थितीत कोणीही दुसऱ्यापेक्षा कमी नाही. आता सर्व संघांना आणखी किमान ५ सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत, यावेळी नेट रनरेट मोठी भूमिका बजावेल. तसेच तुम्हाला २१ मे पर्यंत म्हणजेच शेवटच्या लीग सामन्यापर्यंत चार प्लेऑफ संघांच्या नावांची प्रतीक्षा करावी लागेल असं दिसतंय.
प्ले-ऑफची गणितं काय सांगतात?
गुजरात टायटन्स हा या क्षणी गुणतालिकेत एकमेव संघ आहे, जो प्ले-ऑफच्या अगदी जवळ आहे. हा संघ केवळ 8 सामने खेळला असून 6 विजयानंतर 12 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. यानंतर राजस्थान रॉयल्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर लखनऊ सुपर जायंट्स, चौथ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्ज, पाचव्या क्रमांकावर आरसीबी आणि सहाव्या क्रमांकावर पंजाब किंग्जचा संघ आहे. या सर्व संघांचे ९-९ सामन्यांत ५-५ विजयानंतर १०-१० गुण आहेत. पण नेट रनरेटच्या बाबतीत, टॉप 4 संघ आरसीबी आणि पंजाबपेक्षा खूप पुढे आहेत. त्यानंतर सातव्या क्रमांकावर मुंबई आहे ज्याने फक्त 8 सामने खेळले आहेत आणि चार विजयानंतर 8 गुण आहेत. KKR 8 व्या क्रमांकावर आहे ज्याने 9 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. त्यानंतर 9व्या स्थानावर असलेल्या सनरायझर्सचे 8 सामन्यांत 6 गुण आहेत. दुसरीकडे, आठपैकी 6 सामने गमावलेली दिल्ली कॅपिटल्स 4 गुणांसह शेवटच्या म्हणजे 10व्या स्थानावर आहे.