IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : शुबमन गिलने ( Shubman Gill) आज मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. मागील चार डावांतील तिसरे शतक झळकावताना त्याने गुजरात टायटन्सला दोनशेपार नेले. टीम डेव्हिड आणि तिलक वर्मा यांनी सोडलेले त्याचे झेल मुंबई इंडियन्सला महागात पडले. मुंबई इंडियन्सचे आज सर्व डावपेच चुकले. त्यात दुष्काळात तेवारा महिना म्हणजे इशान किशन व रोहित शर्मा या दोघांनीही दुखापतीमुळे मैदान सोडले.
१७ चेंडूंत ८८ धावा! शुबमन गिलने चमत्कार केला ना भावा, रोहित शर्मानेही केलं कौतुक
शुबमन आणि वृद्धीमान साहा ( १८) यांनी अर्धशतकी भागीदारी केली. पियूष चावलाने गुजरातला पहिला धक्का दिला. त्यानंतर शुबमन व साई सुदर्शन यांचाच बोलबाला राहिला. शुबमनने ४९ चेंडूंत ४ चौकार व ८ षटकारांसह यंदाच्या पर्वातील तिसरे शतक झळकावले. साई सुदर्शनने दुसऱ्या विकेटसाठी शुबमनसह ६४ चेंडूंत १३८ धावांची भागीदारी केली. शुबमनचा प्रत्येक फटका आज वाखाण्यजोग होता आणि त्यात कोणताच आक्रसताळेपणा नव्हता. तंत्रशुद्ध फलंदाजी कशी करावी अन् मनगटाचा सुरेख वापर करून चेंडू कसा भिरकावा हे आज शुबमनने दाखवून दिले. त्याचे फटके नेत्रदिपक होते अन् रोहितनेही त्याचे कौतुक केले. १७व्या षटकात मढवालने MIला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. शुबमन ६० चेंडूंत ७ चौकार व १० षटकारांसह १२९ धावांवर झेलबाद झाला.
शुबमच्या फटकेबाजीने मुंबईचे गोलंदाज गांगरले होते आणि सुदर्शन व हार्दिक पांड्या यांनी याचा पूरेपूर फायदा उचलला. सुदर्शनला ४३ ( ३१ चेंडू) धावांवर रिटायर्ड आऊट व्हावे लागले, राशीद खान मैदानाव आला अन् त्याने चांगले फटके मारले. हार्दिकने १३ चेडूंत २८ धावा करताना गुजरातला ३ बाद २३३ धावांपर्यंत पोहोचवले.