IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी झालेल्या सामन्यात घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सवर थरारक विजयाची नोंद केली. RCBचा हा इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील चौथा विजय ठरला. RCB ने १८९ धावा केल्या आणि RRच्या फलंदाजांची फौज पाहता ते या धावांचा बचाव करू शकतील असे वाटत नव्हते. पण, त्यांना ६ बाद १८२ धावाच करता आल्या आणि RCBने ७ धावांनी सामना जिंकला. या सामन्यात RRकडून खेळणाऱ्या आर अश्विनची ( R Ashwin) विकेट पडल्यानंतर एकीकडे अनुष्का शर्मा आनंदाने जल्लोष करताना दिसली, तर दुसरीकडे अश्विनची मुलगी ढसाढसा रडू लागली.
RCBकडून फॅफ ड्यू प्लेसिस ( ६२) व ग्लेन मॅक्सवेल ( ७७) यांनी चांगली फटकेबाजी केली, परंतु RRच्या गोलंदाजांनी अखेरच्या ५ षटकांत मॅच फिरवली अन् RCBला ९ बाद १८९ धावांपर्यंत रोखले. ट्रेंट बोल्ट व संदीप शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कल यांनी ९८ धावांची भागीदारी करताना RRला चांगली सुरुवात करून दिली. जैस्वाल ४७ आणि पडिक्कल ५२ धावांवर बाद झाले. संजू सॅमसनने २२ धावा केल्या. ध्रुव जुरेल व आर अश्विन यांनी चांगली खेळी केली होती.
हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात अश्विन १२ धावांवर झेलबाद झाला. ही विकेट पडताच स्टँडमध्ये बसलेलील अश्विनची मुलगी रडू लागली.