Michael Bracewell, RCB, IPL 2023: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ IPL ची सुरुवात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याने करणार आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली संघ छान दिसत आहे. मुंबई विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ने सराव सामना खेळला, ज्यामध्ये ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) तुफानी फलंदाजी केलीच, पण नवख्या मायकल ब्रेसवेलने दमदार शतक ठोकले आणि आपल्यावर लागलेली बोली सार्थ ठरवली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आपला पहिला सामना घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 2 एप्रिल रोजी होणारा हा सामना संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. गेल्या वर्षी प्ले-ऑफमध्ये पोहोचलेली RCB आणि IPL च्या इतिहासात सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारी मुंबई यांच्यात ही रोमांचक लढत होणार आहे. त्याआधी मायकल ब्रेसवेलने आपली उपयुक्तता सिद्ध केल्याने RCB चे चाहते खुश झाल्याचे चित्र आहे.
RCB ने विराट कोहलीच्या अनुपस्थितीत हा सराव खेळ खेळला. सुयश आणि फाफ डुप्लेसिस यांची दोन कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. सुयशच्या संघाने 20 षटकात 217 धावा केल्या, ज्यामध्ये महिपाल लोमरोरने 27 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेल चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असून त्याने 46 चेंडूत नाबाद 78 धावा केल्या. प्रत्युत्तरात फाफ डुप्लेसिसचा संघ निर्धारित 20 षटकांत केवळ 215 धावाच करू शकला. मायकेल ब्रेसवेलने 55 चेंडूत 105 धावा करत आपले शतक पूर्ण केले. तो नाबाद राहिला. फाफ डुप्लेसिसने 35 चेंडूत 47 धावा केल्या.