IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live : विराट कोहलीनं ( Virat Kohli) आज बंगळुरूचं चिन्नास्वामी स्टेडियम दणाणून सोडलं. आयपीएल २०२३च्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू समोर विजय हाच एक मार्ग उरला आहे. त्यात फॅफ ड्यू प्लेसिसच्या विकेटनंतर RCBची मधली फळी ढेपाळली. पण, विराटने जिद्द न सोडता दमदार फटकेबाजी केली. नॉन स्ट्रायकर एंडला उभं राहून विराटने पाच विकेट्स पडताना पाहिल्या, परंतु त्याने एकाग्रतेत खंड पडू दिला नाही. मिळेल तो चेंडू त्याने सीमापार अगदी पारंपरिक फटके मारून पाठवला. त्याचा एकही फटका हा विचित्र नव्हता... त्याने आज डोळ्यांचे पारणे फेडणारी खेळी केली.
आयपीएल इतिहासात आता सर्वाधिक ७ शतकं विराटच्या नावावर नोंदवली गेली आहेत. शिवाय आयपीएलमध्ये सलग दोन शतकं झळकावणारा तो शिखर धवन ( २०२०) आणि जॉस बेटलर ( २०२२) यांच्यानंतर तिसरा फलंदाज ठरला. या सामन्यानंतर विराटने टीकाकारांना झोडले. काही दिवसांपूर्वी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीला आतापासून सुरुवात करून देताना विराट, रोहित यांना वन डे व कसोटीवर लक्ष केंद्रीत करण्याची कल्पना मांडली होती. शिवाय हार्दिक पांड्याकडे ट्वेंटी-२०चे नेतृत्व सोपवून बीसीसीआयने तशी तयारी आधीच सुरू केली. पण, विराटने आज सर्वांना फैलावर घेतले.
विराटने यंदाच्या पर्वात १४ सामन्यांत ६३९ धावा केल्या आहेत आणि ऑरेंज कॅप शर्यतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट म्हणाला,''पाच विकेट्स गमावल्यानंतर अनुज रावत हा शवेटता स्पेशालिस्ट फलंदाज उरला होता. आम्ही दोघांनी सामन्यात कमबॅक केले आणि १९० धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. अनेकांना वाटतंय की माझं ट्वेंटी-२० क्रिकेट उतरणीच्या वळणावर आहे, परंतु मला तसं वाटत नाही. मी माझं सर्वोत्तम ट्वेंटी-२० क्रिकेट खेळतोय.''