Harshal Patel, IPL 2023 RCB vs LSG : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. KKR आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात रिंकू सिंगने शेवटच्या षटकातील शेवटच्या 5 चेंडूंवर षटकार ठोकून चमत्कार केला. तर पुढच्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स संघासोबत असा चमत्कार घडला, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मॅचमध्ये लखनौला शेवटच्या षटकात विजयासाठी फक्त 5 धावांची गरज होती. लखनौला सामना जिंकण्याची संधी होती पण शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या हर्षल पटेलने बंगळुरूसाठी संधी निर्माण केली, पण त्याच्याच चुकीने त्याने ती संधी गमावली.
शेवटची थ्रिलर ओव्हर
हर्षल पटेल शेवटचे षटक टाकायला आला आणि समोर जयदेव उनाडकट होता. पहिल्या चेंडूवर उनाडकटने सिंगल घेत मार्क वुडकडे स्ट्राईक सोपवली. दुसऱ्या चेंडूवर हर्षलने यॉर्कर चेंडूवर वुडला बाद केले आणि आरसीबीचे चाहते नाचू लागले. हर्षलची IPL मधील ही 100वी विकेट होती. आता लखनौला विजयासाठी ४ चेंडूत ४ धावांची गरज होती. येथून सामना बेंगळुरूकडे वळताना दिसत होता. पण रवी बिश्नोई क्रीझवर आला आणि तिसऱ्या चेंडूवर बिश्नोईने २ धावा घेतल्या. सामना पुन्हा एकदा लखनौकडे झुकला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर बिष्नोईने एक धाव घेत धावसंख्या बरोबरीत आणली. आता इथून सामन्याचा उत्साह वाढला. सुपर ओव्हरची इच्छा चाहत्यांच्या मनात घर करू लागली होती. त्यानंतर उनाडकट पाचव्या चेंडूवर बाद झाला. यानंतर पुन्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.आता लखनौला शेवटच्या चेंडूवर 1 धाव हवी होती आणि धावसंख्या बरोबरीवर होती. सुपर ओव्हरची अपेक्षा दिसत होती. पण नशीबाने लखनौची साथ दिली.
हर्षल पटेल चुकला 'मँकाडिंग'
शेवटच्या चेंडूपूर्वी कर्णधार फॅफ आणि गोलंदाज यांच्यात संभाषण झाले. यानंतर हर्षल गोलंदाजी करायला गेला. बिष्णोई नॉन स्ट्राइकवर होता. अशा स्थितीत हर्षलने हुशारी दाखवत मंकडिंगचा प्रयत्न करत बिश्नोईला बाद करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा प्रयत्न चुकला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने थ्रो करून बिश्नोईला धावबाद करण्याचा प्रयत्न केला, चेंडूही स्टंपला लागला. आऊटचे अपील अंपायरने फेटाळले.
गोलंदाजाने आपली अँक्शन पूर्ण केली होती, त्यामुळे बिश्नोई धावबाद झाला नाही!
MCC च्या नियम 38.3.1.2 नुसार, जर नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या फलंदाजाने क्रीझ सोडली असेल, आणि ते सुद्धा जेव्हा गोलंदाजाने त्याची क्रिया पूर्ण केली असेल आणि तो चेंडू फेकण्याच्या रिलीझ पॉइंटपर्यंत पोहोचला असेल, तर गोलंदाज नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या फलंदाजाला धावबाद करू शकत नाही.