IPL 2023, Royal Challengers Bangalore Vs Lucknow Super Giants Team Live : फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर आज चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी वादळी खेळी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला २१२ धावांचा डोंगर उभारून दिला. लखनौ सुपर जायंट्सकडून अपेक्षित सुरुवात झाली नाही आणि पॉवर प्लेमध्ये त्यांची खेळी संथ राहिली. मार्कस स्टॉयनिस व निकोलस पूरन यांनी नंतर येताना LSGसाठी जबरदस्त फटकेबाजी करताना मॅच फिरवली होती. पूरनने आयपीएल २०२३ मधील सर्वात वेगवान अर्धशतक १५ चेंडूंत झळकावले आणि RCBच्या हातचा सामना खेचून नेला होता. पण आयुष बदोनी विजयासाठी ७ धावा हव्या असताना हिट विकेट झाला अन् सामन्यात पुन्हा जीवंतपणा आला. अखेरच्या चेंडूवर लखनौने बाजी मारली
मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात LSG चा ओपनर कायले मायर्सचा त्रिफळा उडवला. ९ वर्षांनंतर RCBच्या ताफ्यात परतलेल्या वेन पार्नेलने त्याच्या पहिल्या षटकात लखनौला दोन धक्के दिले. दीपक हुडा ( ९) व कृणाल पांड्या ( ०) यांना दिनेश कार्तिककरवी झेलबाद करून पार्नेलने RCBला मोठं यश मिळवून दिले. मार्कस स्टॉयनिस मैदानावर आला आणि त्याने सामन्याला गती दिली. त्याने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना लखनौला विजयाचे स्वप्न दाखवले. कर्ण शर्माने RCBला महत्त्वाची विकेट काढून दिली. त्याने ३० चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह ६५ धावा केल्या.
त्यानंतर लोकेश राहुलने आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु सिराजने त्याची विकेट घेतली. विराटने चांगला झेल टिपताना लोकेशला १८ धावांवर माघारी पाठवले. निकोलस ऐकत नव्हता आणि RCB चं टेंशन वाढताना दिसले. निकोलसने सलग तीन षटकार खेचून चेंडू व धावा यांच्यातील अंतर कमी केले. त्याने १३ व १४व्या षटकात मिळून ३८ धावा कुटल्या. आयुष बदोनी त्याला उत्तम साथ देताना दिसला. निकोलने आयपीएलमध्ये १००० धावांचा टप्पा आज ओलांडला. निकोलसने १५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना अजिंक्य रहाणेचा ( १९ चेंडूंत) यंदाच्या पर्वातील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम मोडला. पूरनची फटकेबाजी पाहून RCBचे चाहते निराश झाले होते आणि स्टेडियमवर स्मशान शांतता होती.
RCB दोन षटकं मागे असल्याने त्यांना पाचऐवजी चार खेळाडूच ३० यार्डाबाहेर ठेवण्याची पेनल्टी बसली. हर्षल पटेलने दुसऱ्या चेंडूवर मार्क वूडचा त्रिफळा उडवला. रवी बिश्नोईने पहिल्याच चेंडूवर चतुराईने दोन धावा पळून काढल्या अन् ३ चेंडू २ असे समीकरण झाले. पुढच्या चेंडूवर बिश्नोईने एक धाव घेतली आणि धावा समान झाल्या. जयदेव उनाडकटने पूल मारला अन् तो झेलबाद झाला. १ चेंडू १ धाव असे गणित झाले अन् नवीन फलंदाज स्ट्राईकवर होता. हर्षलने मांकडिंग करण्याचा प्रयत्न केला. पण लखनौने १ विकेटने हा सामना जिंकला.
तत्पूर्वी, विराटने आयपीएलमध्ये ४६ अर्धशतकं आणि ५ शतकं झळकावली आहेत. ४१ वर्षीय अमित मिश्राने RCB ला पहिला धक्का दिला. विराट ४४ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार खेचून ६१ धावांवर बाद झाला. फॅफ व मॅक्सवेल यांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडताना ४३ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. फॅफ ४६ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ७९ धावांवर नाबाद राहिला, तर मॅक्सवेल २९ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकार खेचून ५९ धावांवर बाद झाला. RCB ने २ बाद २१२ धावा केल्या. फॅफने आयपीएल २०२३ मध्ये सर्वात लांब ११५ मीटर षटकार खेचून चेंडू स्टेडियमच्या छतावर पोहोचवला.