IPL 2023, Royal Challengers Bangalore Vs Lucknow Super Giants Team Live : विराट कोहली ( Virat Kohli)ने पुन्हा चिन्नास्वामी स्टेडियमवर दमदार खेळ केला. त्याने ६१ धावांची स्फोटक खेळी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पहिल्या विकेटसाठी ६९ चेंडूंत ९६ धावांची सलामी मिळवून दिली. लखनौ सुपर जायंट्सच्या फिरकीपटूंनी RCBच्या धावांची गती मंदावली होती, परंतु कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांचे वादळ घोंगावले. पण, विराटला वैयक्तिक विक्रमाची अधिक चिंता असल्याची टीका समालोचक सायमन डॉल ( Simon Doull ) यांनी केली.
लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराटने आयपीएलमध्ये ४६ अर्धशतकं आणि ५ शतकं झळकावली आहेत. ४१ वर्षीय अमित मिश्राने RCB ला पहिला धक्का दिला. विराट ४४ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार खेचून ६१ धावांवर बाद झाला. RCBने पहिल्या १३ षटकांत १ बाद १०३ धावा केल्या होत्या. पण, फॅफ व ग्लेन मॅक्सवेलने LSGचे गणित बिघडवले. मॅक्सवेलनेही २४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. फॅफ व मॅक्सवेल यांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडताना ४३ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. फॅफ ४६ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ७९ धावांवर नाबाद राहिला, तर मॅक्सवेल २९ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकार खेचून ५९ धावांवर बाद झाला. RCB ने २ बाद २१२ धावा केल्या. फॅफने आयपीएल २०२३ मध्ये सर्वात लांब ११५ मीटर षटकार खेचून चेंडू स्टेडियमच्या छतावर पोहोचवला.
दरम्यान, समालोचक सायमन डॉल यांनी विराटवर टीका केली. ते म्हणाले, विराटने २५ चेंडूंत ४२ धावा केल्या आणि अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याने १० चेंडू खेळून काढली. संघाचा विचार करून चौकार खेचण्यापेक्षा त्याला स्वतःच्या वैयक्तिक विक्रमाची चिंता अधिक होती. अर्धशतक झळकावलं चांगली गोष्ट आहे, परंतु त्याने संघाचा विचार करायला हवा.