IPL 2023, Royal Challengers Bangalore Vs Lucknow Super Giants Team Live : विराट कोहली ( Virat Kohli)ने पुन्हा चिन्नास्वामी स्टेडियमवर दमदार खेळ केला. त्याने आज ६१ धावांची स्फोटक खेळी करताना ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाची नोंद केली. लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला फॅफ ड्यू प्लेसिस व विराट कोहली यांनी चांगली सुरूवात करून दिली. फॅफने आजच्या सामन्यात दुसरी धाव घेताच आयपीएलमध्ये ३५०० धावांचा टप्पा ओलांडला. विराटने चांगले फटके मारले.
रवी बिश्नोईने RCBच्या स्टार फलंदाजाला हैराण केले होते. फिरकी गोलंदाज आल्याने विराटचा खेळ थोडासा मंदावला. त्याने ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. विराटने आयपीएलमध्ये ४६ अर्धशतकं आणि ५ शतकं झळकावली आहेत. ४१ वर्षीय अमित मिश्राने RCB ला धक्का दिला. विराट ४४ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार खेचून ६१ धावांवर बाद झाला.
विराटने आज ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत चौथे स्थान पटकावताना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंचला मागे टाकले. Most runs in T20 history: या विक्रमात ख्रिस गेल १४५६२ धावांसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ शोएब मलिक ( १२५२८), किरॉन पोलार्ड ( १२१७५), विराट ( ११४२९*) आणि फिंच ( ११३९२) यांचा क्रमांक येतो. विराटनंतर कर्णधार फॅफ व ग्लेन मॅक्सवेल यांनी फटकेबाजी केली. RCB ने १५ षटकांत १ बाद १३७ धावा केल्या आहेत.