IPL 2023, Royal Challengers Bangalore Vs Lucknow Super Giants Team Live : विराट कोहली ( Virat Kohli) आणि चिन्नास्वामी हे एक वेगळेच समीकरण आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर विराटने सर्वाधिक धावा केल्या आहेत आणि आजही त्याने लखनौ सुपर जायंट्सच्या खेळाडूंना चोपून काढले. फॅफ ड्यू प्लेसिस आज सावध खेळ करताना दिसला, कारण विराटचा धावांचा वेगच भन्नाट होता. पण, त्याच्या वेगाला ४१ वर्षीय गोलंदाजाने ब्रेक लावला. तंबूत परण्यापूर्वी विराटने मोठा पराक्रम केला.
लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला फॅफ ड्यू प्लेसिस व विराट कोहली यांनी चांगली सुरूवात करून दिली. फॅफने आजच्या सामन्यात दुसरी धाव घेताच आयपीएलमध्ये ३५०० धावांचा टप्पा ओलांडला. विराटने चांगले फटके मारले आणि RCBला ५.३ षटकांत ५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. यात ४० धावा विराटच्या होत्या. विराट आज वेगळ्याच रंगात होता, रवी बिश्नोईचा डाव्या बाजूने जाणाऱ्या चेंडूवर फटका चुकल्यावर विराट स्वतःवर संतापलेला दिसला. बिश्नोईने RCBच्या स्टार फलंदाजाला हैराण केले होते. फिरकी गोलंदाज आल्याने विराटचा खेळ थोडासा मंदावला अन् त्याने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी ३५ चेंडू खेळले.
कृणालच्या पुढच्या षटकात विराटने खणखणीत षटकार खेचला. RCB ने १० षटकांत बिनबाद ८७ धावा फलकावर चढवल्या. विराटने आयपीएलमध्ये ४६ अर्धशतकं आणि ५ शतकं झळकावली आहेत. आयपीएलमध्ये सध्या खेळणाऱ्या सर्व संघांविरुद्ध अर्धशतक झळकावणारा विराट हा ऋतुराज गायकवाडनंतर दुसरा फलंदाज ठरला. आज तो सहावं शतक झळकावेल असा विश्वास समालोचन करणाऱ्या केदार जाधवने व्यक्त केला, परंतु ४१ वर्षीय अमित मिश्राने चाहत्यांचे हे स्वप्न अपूर्ण ठरवले. विराट ४४ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार खेचून ६१ धावांवर बाद झाला.
विराटची प्रत्येक संघाविरुद्ध सर्वोत्तम खेळीCSK - 90* DC - 99 GT - 73 KKR - 100 MI - 92* PBKS - 113 RR - 72* SRH - 93* LSG - 61