IPL 2023, Royal Challengers Banglore vs Mumbai Indians Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये घरच्या मैदानावरील पहिल्या सामन्यात चांगली सुरूवात केली. मुंबई इंडियन्ससारखा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ समोर असतानाही RCB ने पॉवर प्ले मध्येच दम दाखवला. इशान किशन, रोहित शर्मा व कॅमेरून ग्रीन या तगड्या फलंदाजांना माघारी पाठवून RCBने सामन्यावर पकड घेतली. पण, त्यांनाही मोठा झटका बसला आणि क्षेत्ररक्षण करताना त्यांचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त होऊन माघारी परतला.
मोहम्मद सिराज, रिसे टॉपली आणि आकाश दीप या RCBच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये दम दाखवताना MIच्या तीन विकेट्स उडवल्या. सिराजने तिसऱ्या षटकात इशान किशनला ( १०) चतुराईने झेलबाद केले. त्यानंतर कॅमेरून ग्रीन ( ५) याचा टॉपलीने त्रिफळा उडवला. ग्रीनसाठी मुंबईने बक्कळ पैसा मोजला होता आणि त्यामुळे स्पर्धेआधीच त्याची हवा झाली होती. पण, पहिल्या सामन्यात तरी ती हवा फुसकी ठरली. सिराजच्या गोलंदाजीवर रोहित शर्माचा झेल उडाला होता, परंतु दीनेश कार्तिक व सिराज दोघंही झेल घेण्यासाठी पळाले आणि झेल सुटला. पण, या जीवदानानंतर रोहितला ( १) मोठी खेळी करता आली नाही. आकाश दीपने ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. तिलक वर्माने खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील ४०० धावा पूर्ण केल्या.
सामन्याच्या ८व्या षटकात तिलकने मारलेला चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात गोलंदाज रिसे टॉपली पडला अन् त्याच्या खांद्याला दुखापत झाली. वेदनेने तो व्हिवळत होता आणि तातडीने वैद्यकीय टिमने मैदानावर धाव घेतली. त्याला मैदान सोडावे लागले. आयपीएल २०२३ ला सुरूवात होण्यापूर्वी रजत पाटीदार आणि जोश हेझलवूड या दोन खेळाडूंना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती त्यात आता टॉपलीची भर पडतेय की काय अशी भिती वाटू लागली आहे. दरम्यान, मायकेल ब्रेसवेलने फिरकीवर सूर्यकुमार यादवची ( १५) विकेट घेत मुंबईला चौथा धक्का दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"