IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : फॅफ ड्यू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी आज मोहालीचं मैदान गाजवलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ९८ चेंडूंत १३७ धावांची भागीदारी केली आणि ११ वर्षांपूर्वीचा एक मोठा विक्रम मोडला. मोहालीत २०१२ मध्ये एबी डिव्हिलियर्स व ख्रिस गेल यांनी १३१ धावांची भागीदारी केली होती आणि तो विक्रम आज फॅफ व विराटने मोडला. पण, १६ षटकं हे फलंदाज खेळपट्टीवर राहूनही संघाला त्याचा फार फायदा नाही झाला. RCBला अखेरच्या १० षटकांत ४ बाद ८४ धावाच करता आल्या.
विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२०त महेंद्रसिंग धोनीलाही टाकले मागले; ठरला यशस्वी कॅप्टन
फॅफने वादळी फटकेबाजी करताना यंदाच्या आयपीएलमध्ये ३०० धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला. फॅफने ३२ चेंडूंत IPL 2023 मधील चौथे अर्धशतक पूर्ण केले. विराटनेही ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. फॅफ व विराट मैदानावर असूनही अपेक्षित रन रेट दिसत नव्हता, पंजाबच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांत चांगला मारा केला. हरप्रीत ब्रारने PBKSला पहिले यश मिळवून दिले. त्याने टाकलेला चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा विराटकडून प्रयत्न झाला अन् यष्टिरक्षक जितेश शर्माने चतुराई दाखवताना झेल घेतला. विराट ४७ चेंडूंत ५९ धावांवर बाद झाला. पुढच्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल ( गोल्डन डक) बाद झाला. हरप्रीतची हॅटट्रिक काही पूर्ण होऊ शकली नाही.
फॅफ आज शतक पूर्ण करेल असे वाटले होते आणि त्याने नॅथन एलिसचा चेंडू सीमापार पाठवला. पंजाबची मालकीण प्रीति झिंटा टेंशनमध्ये दिसली, पण पुढच्याच चेंडूवर एलिसने हे टेंशन हलकं केलं. सॅम कुरनने सीमारेषेवर सुरेख झेल टिपला. फॅफ ५६ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकार खेचून ८४ धावांवर बाद झाला. दिनेश कार्तिक ( ७) आजही फेल गेला. RCBचे मोठी धावसंख्या गाठण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले आणि त्यांना ४ बाद १७४ धावांवर समाधान मानावे लागले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"