IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Rajasthan Royals Live : मोक्याच्या क्षणी विकेट पडल्या की कसा सामना कलाटणी घेतो... हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या सामन्यात दिसले. RCBचे दोन सेट फलंदाज फॅफ ड्यू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल मागोमाग बाद झाले अन् त्यांच्या धावांची गती मंदावली... लक्ष्याचा पाठलाग करताना RRसाठी यशस्वी जैस्वाल व देवदत्त पडिक्कल यांनी चांगली खेळी केली. पण, हे दोघंही माघारी परतल्याने RCBला डोकं वर काढण्याची संधी मिळाली. तरीही RR ने अखेरपर्यंत कडवी टक्कर दिली. ध्रुव जुरेल व आर अश्विनने RCB चे टेंशन वाढवले होते, परंतु विराटच्या संघाने कसाबसा विजय मिळवला.
बोल्ट करू शकतो, तर मी का नाही! मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात उडवला दांडा, Video
फॅफ ड्यू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६६ चेंडूंत १२६ धावांची भागीदारी केली. या दोघांमुळे RCB ने सामन्यात चांगलेच पुनरागमन केले होते, परंतु हे दोघं मागोमाग तंबूत परतले अन् RCBच्या अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. फॅफ ३९ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारासह ६२ धावांवर रन आऊट झाला. मॅक्सवेल ७७ धावांवर ( ४४ चेंडू, ६ चौकार व ४ षटकार) झेलबाद झाला. १५ षटकांत RCBच्या ४ बाद १५६ धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर RCBच्या अन्य फलंदाजांना ५ षटकांत ३३ धावाच करता आल्या. RCBने ५ फलंदाज गमावले. बोल्टने ४१ धावांत २, अश्विनने ३६ धावांत १ विकेट घेतली. RCBला जेमतेम ६ बाद १८९ धावांपर्यंत पोहोचता आले.
RRची सुरुवातही यजमानांसारखी झाली. मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात RRचा ओपनर जॉस बटलरचा त्रिफळा उडवला. पण, यशस्वी जैस्वाल व लोकल बॉय देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून RCBवर दडपण निर्माण करण्यात यश मिळवले. ( पाहा जॉस बटलरची विकेट ) देवदत्तने यंदाच्या पर्वातील पहिले अर्धशतक ३० चेंडूंत पूर्ण करताना घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवले. १२व्या षटकात डेव्हिड विलीने ९८ धावांची ही भागीदारी तोडली. देवदत्त ३४ चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचून ५२ धावांवर माघारी परतला.
RCBकडून आता राजस्थानवर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसला. सुयश प्रभुदेसाईने क्षेत्ररक्षणात कमाल दाखवताना संघासाठी बऱ्याच धावा वाचवल्या. त्याने दडपण वाढले अन् यशस्वी फटका मारण्याच्या प्रयत्नात (४७) विराटच्या हाती झेल देऊन बसला. हर्षल पटेलने आणखी एक धक्का देताना संजू सॅमसनला २२ धावांवर माघारी पाठवले. ३० चेंडूंत ६९ धावांची गरज असताना संजूने धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अपयशी ठरला. शिमरोन हेटमायर व ध्रुव जुरेल यांच्यावर सर्व मदार होती आणि RRच्या डगआऊटमध्ये टेंशन वाढताना दिसले.
१८ चेंडू ४५ धावा हव्या असताना जुरेलने १८व्या षटकाचा पहिला चेंडू षटकार खेचला. सूयश आज क्षेत्ररक्षणात खतरनाक कामगिरी करताना दिसला अन् १८व्या षटकात त्याने एक स्टम्प दिसत असताना अचूक निशाणा साधून हेटमायरला ( ३) माघारी पाठवले. जुरेलने चांगले फटके मारल्याने ६ चेंडू २० धावा असा सामना रंगतदार अवस्थेत आला. हर्षलने टाकलेला संथ गतीचा चेंडू अश्विनने चौकार खेचला. षटकांची मर्यादा संथ राखल्याने अखेरच्या षटकात RCBला पाचऐवजी ४ खेळाडूच ३० यार्ड सर्कलबाहेर ठेवावे लागले. दुसऱ्या चेंडूवर विलीने रन आऊटची संधी गमावली. ४ चेंडू १४ धावा असा सामना आला आणि अश्विनने चौकार खेचला. चौथ्या चेंडूवर अश्विन ( १२ धावा ५ चेंडू) झेलबाद झाल्याने २ चेंडू १० असा सामना चुरशीचा झाला. RRला ६ बाद १८२ धावांवर्यंत मजल मारता आली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, RCB vs RR Live Marathi : RCB beat Rajasthan Royals by 8 runs, 4th win for Royal Challengers Bangalore in this IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.