IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore Live Marathi : प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी RCBला ही मॅच जिंकणे महत्त्वाचे होते. विराट कोहली आणि फॅफ ड्यू प्लेसिस या जोडीने आज खणखणीत फटकेबाजी करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सहज विजयासमीप पोहोचवले. विराटने आयपीएल २०२३मधील त्याचे पहिले शतक झळकावताना सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले. हेनरिच क्लासेनच्या शतकाला विराटने तोडीसतोड उत्तर दिले. विराटने ६२ चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारांसह शतक झळकावले.
विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी तशीच दणदणीत सुरुवात करून दिली. दोघांनी पॉवर प्लेमध्ये ६४ धावा फलकावर चढवल्या. पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज भुवनेश्वर कुमारही आज काहीच करू शकला नाही. पण, ९व्या षटकात नितीश रेड्डीने ८८ धावांची भागीदारी तोडली होती... डागरने अप्रतिम झेल घेत फॅफला ४१ ( २५ चेंडू) धावांवर बाद केले होते. पण, अम्पायरने बाऊन्सर चेक केला अन् तो षटकातील दुसरा बाऊन्सर असल्याने नो बॉल ठरला आणि फॅफ नाबाद राहिला. फॅफने ३४ चेंडूंत यंदाच्या पर्वातील आठवे अर्धशतक झळकावताना विराटसह शतकी भागीदारी पूर्ण केली. विराटनेही पुढच्या चेंडूवर चौकार केचून ३५ चेंडूंत यंदाच्या पर्वातील सातवे अर्धशतक पूर्ण केले.
विराटने आयपीएल २०२३ मध्ये ५०० धावांचा टप्पाही ओलांडला आणि आयपीएलच्या सहा पर्वात त्याने हा पराक्रम केला. भारतीय फलंदाजांमध्ये असा पराक्रम करणारा विराट एकमेव ठरला. दोघांची फटकेबाजी लाजवाब ठरली आणि त्यांचे टायमिंग कौतुकास्पद होते. भुवीने टाकलेल्या १५व्या षटकात विराटने अप्रतिम पुस्तकी फटके मारून ३ चौकार मिळवले अन् संघाला १५० धावांपर्यंत पोहोचवले. या दोघांनी यंदाच्या पर्वात ८००+ धावांची भागीदारी केली आणि आयपीएल इतिहासात पहिल्या विकेटसाठी एका पर्वातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी जॉनी बेअरस्टो व डेव्हिड वॉर्नर यांनी २०१९च्या पर्वात १० सामन्यांत ७९१ धावा जोडल्या होत्या.
विराटने 63 चेंडूंत 100 धावांवर झेलबाद झाला. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील हे त्याचे 7वे शतक ठरले अन् त्याने रोहित शर्मा व लोकेश राहुल ( 6 ) यांचा विक्रम मोडला. आयपीएलमध्ये सर्वाधिक 6 शतक झळकावणाऱ्या ख्रिस गेलच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली.