आयपीएलमध्ये चमकणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं आपल्या देशाकडून खेळण्याचं स्वप्न असतं. असेच काही खेळाडू आयपीएल २०२३ मध्ये चमकले. त्यापैकी एक म्हणजे रिंकू सिंह. यंदाचा हंगाम रिंकू सिंहसाठी अविस्मरणीय ठरला आहे. मात्र केकेआरचा संघ आयपीएलच्या प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही. यादरम्यान, रिंकू सिंहने टीम इंडियामध्ये येण्याबाबत मोठं विधान केलं आहे.
आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतरही रिंकू सिंहला आपले पाय जमिनीवर ठेवायचे आहेत. तसेच अद्याप भारतीय संघातून खेळण्याबाबत विचार करत नाही आहे. यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्सविरुद्ध पाच षटकार ठोकून चर्चेत आलेला रिंकू सिंह आयपीएलमधील आघाडीचा फलंदाज आणि फिनिशर म्हणून समोर आला आहे.
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रिंकू सिंहला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी दावेदार म्हटले आहे. मात्र लखनौकडून केवळ एका धावेने पराभव पत्करावा लागल्यानंतर रिंकू सिंहने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, या सत्रातील कामगिरीमुळे कुणालाही चांगलंच वाटेल. मात्र माझी आताच भारतीय संघात निवड होईल, याचा विचार करत नाही आहे. २५ वर्षीय रिंकू सिंहने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चार अर्धशतके फटकावली आहेत. मात्र आपल्या संघाला तो प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवून देऊ शकला नाही.