Rohit Sharma Piyush Chawla, IPL 2023 Mumbai Indians vs Gujarat Titans: गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पियुष चावलावर चांगलाच संतापलेला दिसला. मुंबई इंडियन्सच्या संघाला गुजरात टायटन्स विरुद्ध ५५ धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने सहा बाद 207 धावा करून मुंबईला नऊ बाद 152 धावांवर रोखले. गुजरातने 15 षटकांत 4 बाद 130 धावा केल्या होत्या, मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी शेवटच्या पाच षटकांत 77 धावा दिल्या. मुंबईच्या गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये खराब गोलंदाजी केली. तशातच संघाचा अनुभवी गोलंदाज असलेल्या पियुष चावलावर रोहित नाराज झाला. पण त्याचं कारण त्याची गोलंदाजी नसून दुसरेच होते.
पियुष चावलाने केली चूक अन् रोहित भडकला...
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा मैदानावर सामान्यत: शांत असतो. पण दबावाखाली तो आपला संयम गमावून बसल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. भारतीय संघाचा कर्णधार असतानाही रोहित अनेकदा रागावताना दिसला आहे. आता रोहितचा राग आयपीएलमध्येही पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सचा अनुभवी फिरकीपटू पियुष चावलाने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात चूक केली. रॅली मेरेडिथने 17व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर यॉर्कर टाकला. फलंदाज अभिनव मनोहरने ही बॅट कशीतरी लावली. शॉर्ट थर्ड मॅनवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या पियुष चावलाकडे चेंडू गेला. चेंडू त्याच्या हातात होता पण तो रोखू शकला नाही. त्यामुळे चौकार गेला. त्यामुळे रोहित शर्माला राग अनावर झाला. या चुकीनंतर तो पियुषकडे बघून ओरडू लागला.
दरम्यान, रोहितने अशाप्रकारे चिडणे नेटकऱ्यांना फारसे पटले नाही. सोशल मीडियावर अनेकांनी रोहितच्या अशा वागण्यावर टीका केली.
सामन्यानंतर रोहित काय म्हणाला?
रोहितने सामन्यानंतर गोलंदाजांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. "हा पराभव खूप निराशाजनक आहे. आम्ही शेवटच्या काही षटकांपर्यंत सामन्यावर पकड ठेवली होती. पण त्यानंतर आम्ही खूप धावा दिल्या. आम्ही पून्हा तीच चूक केली. आमची अडचण गोलंदाजीबद्दल आहे. तुम्ही कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करत आहात हे पाहायला हवे असते पण त्यात आम्ही अपयशी ठरलो. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. प्रत्येक संघाची स्वतःची ताकद असते, आमची फलंदाजी चांगली आहे त्यामुळे आम्ही लक्ष्याचा पाठलाग करू इच्छित होतो. आम्ही सुरुवातीपासून फलंदाजीत संघर्ष केला असला तरी आम्हाला आमच्या फलंदाजीवर जास्त विश्वास आहे," असे तो म्हणाला.
Web Title: IPL 2023 Rohit Sharma Piyush Chawla drama spat after misfield Mumbai Indians vs GT see reaction video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.