Rohit Sharma Mumbai Indians IPL 2023: पहिले दोन सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने आता स्पर्धेत सुसाट लय पकडली आहे. या संघाने सलग तीन सामने जिंकले आहेत आणि आता मुंबई झपाट्याने गुणतालिकेत वरच्या दिशेने जात आहे. मंगळवारी रात्री मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा 14 धावांनी पराभव केला. या विजयानंतर कॅमेरून ग्रीन आणि अर्जुन तेंडुलकर यांच्या नावाचा उदो उदो झाला. त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव झाला. पण आणखी एक खेळाडू आहे, ज्याला थेट कर्णधार रोहित शर्माने सलाम केला आहे.
हा खेळाडू दुसरा कोणी नसून तिलक वर्मा आहे. विजयानंतर मुंबई इंडियन्सने त्याला ड्रेसिंग रूममध्ये सन्मानित केले. तिलक वर्माने हैदराबादविरुद्ध १७ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 4 षटकार निघाले. तिलक वर्माच्या या खेळीने मुंबई इंडियन्सला १९२ धावांपर्यंत मजल मारता आली. यामुळेच त्याला ड्रेसिंग रूममध्ये खास बॅज देण्यात आला आणि त्याचा सन्मान करण्यात आला.
रोहित शर्माचं तिलक वर्मासाठी मोठं वक्तव्य
रोहित शर्मा तिलक वर्माच्या खेळीचा फॅन बनला. तिलक वर्मा लवकरच दुसऱ्या एका संघाच्या कपड्यांमध्येही दिसणार असल्याचे रोहित शर्माने सूचक विधान केले. रोहित शर्मा म्हणाला, "तिलक वर्माचे वय आणि त्याची फलंदाजी पाहता तो खूप पुढे जाईल असे स्पष्टपणे दिसते. आपण सारे तिलक वर्माला लवकरच इतर संघांविरूद्ध एका वेगळ्या टीमच्या कपड्यांत खेळताना लवकरच पाहू शकणार आहोत."
दरम्यान, मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू आयपीएलच्या या मोसमात अप्रतिम कामगिरी करत आहे. मुंबईत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तिलक अव्वल आहे. 5 सामन्यात त्याच्या बॅटमधून 214 धावा झाल्या आहेत. या खेळाडूची सरासरी 50 पार आहे. इतकेच नाही तर तिलक वर्माचा स्ट्राईक रेटही जवळपास 160 आहे. त्याने मुंबईसाठी सर्वाधिक 14 षटकार मारले आहेत. टिळक वर्माच्या या कामगिरीमुळे रोहित शर्मा त्याला 'लंबी रेस का घोडा' म्हणाला आहे.