IPL 2023, Rajasthan Royals vs Delhi Capitals Live : दिल्ली कॅपिटल्सला पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने दोन धक्के दिले. न्यूझीलंडच्या गोलंदाजाने आयपीएल २०२३ मध्ये तीन सामन्यातं दुसऱ्यांदा पहिल्या षटकात दोन विकेट मेडन अशी गोलंदाजी केली आहे. पण, दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर ( David Warner) खिंड लढवतोय आणि त्याने मोठा विक्रम केला.
प्लेइंग इलेव्हनमध्ये नसलेल्या पृथ्वी शॉ याला दिल्लीने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर उतरवले. ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात त्याला अपयशी ठरवले. बोल्टचा चेंडू पृथ्वीच्या बॅटची किनार घेत यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या दिशेने गेला अन् संजूनेही उजव्या बाजूला झेप घेत अप्रतिम झेल घेतला. आज खेळण्याची संधी मिळालेला मनीष पांडे ( ०) पहिल्याच चेंडूवर LBW झाला. बोल्टने पहिल्या षटकात DC ला दोन धक्के दिले. रायली रूसो व डेव्हिड वॉर्नर यांनी ३६ धावांची भागीदारी करून दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु आर अश्विनने रूसोला १४ धावांवर बाद करून DC ला ३६ धावांत तिसरा धक्का दिला.
वॉर्नरच्या खेळातील सातत्य याही सामन्यात दिसले अन् त्याने आयपीएलमध्ये ६००० धावांचा टप्पा ओलांडला. आयपीएलमध्ये हा पराक्रम करणारा तो तिसरा आणि पहिला परदेशी खेळाडू ठरला. विराट कोहली- ६७०६* आणि शिखर धवन - ६२८४ यांनी हा पराक्रम केला आहे. पण, वॉर्नरने सर्वात कमी १६५ डावांत हा टप्पा ओलांडला आणि विराट ( १८८) व शिखर ( १९९) यांचा विक्रम मोडला.
राजस्थान रॉयल्सने आज पुन्हा एकदा त्यांच्या फलंदाजीतील ताकद दाखवून दिली. यशस्वी जैस्वाल ( ६०) व जॉस बटलर ( ७९) यांनी पहिल्या विकेटसाठी वादळी सुरूवात केली आणि ८.३ षटकांत ९८ धावा चढवल्या. संजू सॅमसन ( ०) व रियान पराग ( ७) अपयशी ठरले. बटलर व शिमरोन हेटमायर या जोडीने तो वेग पुन्हा मिळवून दिला. बटलरने ५१ चेंडूंत ११ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ७९ धावा चोपल्या. हेटमायरनेही २१ चेंडूंत ३९ धावांची नाबाद खेळी करताना १ चौकार व ४ उत्तुंग षटकार खेचले. राजस्थानने ४ बाद १९९ धावा करून दिल्ली कॅपिटल्ससमोर तगडे लक्ष्य ठेवले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"