IPL 2023, Rajasthan Royals vs Delhi Capitals Live : राजस्थान रॉयस्लच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करून १९९ धावांचा डोंगर उभारला, तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाज पुन्हा अपयशी ठरले. डेव्हिड वॉर्नर ( David Warner) ने सामन्याची जबाबदारी खांद्यावर उचलताना कॅप्टन्स इनिंग्ज खेळली, परंतु ती व्यर्थ ठरली. ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात दोन धक्के देताना DC ला बॅकफूटवर फेकले होते आणि त्यानंतर ते सावरले नाहीच.. वॉर्नरने आयपीएलमध्ये ६१वेळा ५०+ धावा करण्याचा पराक्रम केला. मात्र, दिल्लीला विजय मिळवून देण्यासाठी तो पुरेसा ठरला नाही. दिल्लीचा सलग तिसरा पराभव ठरला.
डेव्हिड वॉर्नर एकटा भिडला! विराट-शिखर यांचा 'गब्बर' रेकॉर्ड मोडला, पहिला परदेशी खेळाडू ठरला
पृथ्वी शॉ याला दिल्लीने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर उतरवले, परंतु तो पुन्हा इम्पॅक्ट पाडण्यात अपयशी ठरला. ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात पृथ्वी व मनिष पांडे यांना बाद करून मेडन ओव्हर टाकली. रायली रूसो व डेव्हिड वॉर्नर यांनी ३६ धावांची भागीदारी करून दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु आर अश्विनने रूसोला १४ धावांवर बाद करून DC ला ३६ धावांत तिसरा धक्का दिला. वॉर्नरच्या खेळातील सातत्य याही सामन्यात दिसले अन् त्याने आयपीएलमध्ये ६००० धावांचा टप्पा ओलांडला. आयपीएलमध्ये हा पराक्रम करणारा तो तिसरा आणि पहिला परदेशी खेळाडू ठरला. पण, त्याने विराट व शिखर यांच्यापेक्षा कमी डावांत हा पल्ला ओलांडला.
वॉर्नर व ललित यादव ही जोडी RRसाठी डोकेदुखी ठरलेली आणि दोघांनी ४४ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी केली होती. पण, RRने पुन्हा ट्रेंट बोल्टला गोलंदाजीवर आणले आणि त्याने ललितचा ( ३८) त्रिफळा उडवून DCची वाईट अवस्था केली. त्यांना १४.५०च्या सरासरीने अखेरच्या ७ षटकांत विजयासाठी धावा करायच्या होत्या. कर्णधार वॉर्नर आणि उप कर्णधार अक्षर पटेल मैदानावर होते. बोल्टने ४-१-२९-३ असा स्पेल टाकला. अक्षर ( २) आजही अपयशी ठरला अन् युझवेंद्र चहलने ही विकेट मिळवून दिली. रोव्हमन पॉवेलही ( २) अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने पुन्हा एकदा वॉर्नरची खेळी व्यर्थ जाणार हे स्पष्ट झाले. चहलने RRला वॉर्नरची ( ६५) विकेट मिळवून दिली. दिल्लीला ९ बाद १४२ धावा करता आल्या. ५७ धावांनी राजस्थानने दुसरा विजय मिळवला.
तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सने ४ बाद १९९ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल ( ६०) व जॉस बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी वादळी सुरूवात केली आणि ८.३ षटकांत ९८ धावा चढवल्या. बटलरने ५१ चेंडूंत ११ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ७९ धावा चोपल्या. हेटमायरनेही २१ चेंडूंत ३९ धावांची नाबाद खेळी करताना १ चौकार व ४ उत्तुंग षटकार खेचले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"