IPL 2023, Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सची सुरुवात काही खास झाली नाही. जॉस बटलरची अपयशाची मालिका आजही कायम राहिली. मागील सामन्यातील शतकवीर यशस्वी जैस्वालने आज कर्णधार संजू सॅमसनसहगुजरात टायटन्सच्या गोलंदाजांचा सामना केला. पण, दोघांमध्ये ताळमेळ चुकले अन् यशस्वीला माघारी जावे लागले. त्यापाठोपाठ संजूही ३० धावांवर बाद झाला.
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स दोन्ही संघ आयपीएल २०२३ मध्ये पुन्हा एकदा विजयपथावर येण्यासाठी उत्सुक आहेत. मागील लढतीत दोघांनाही हार पत्करावी लागली होती. GT १२ गुणांसह टेबल टॉपर आहे आणि RR ला आज विजय मिळवून खात्यातील गुणांची संख्या १२ करण्याची संधी आहे. RR ने पहिल्या टप्प्यात गुजरातला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले होते आणि त्याची परतफेड करण्यासाठी GT उत्सुक आहेत. RR ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॉस बटलरची बॅट त्याच्यावर रुसल्याचे आजही दिसले.. हार्दिक पांड्याला दोन सलग चौकार खेचल्यानंतर बटलर ( ८) तिसऱ्या चेंडूवर मोहित शर्माच्या हाती झेल देऊन परतला. पण, यशस्वी जैस्वालने त्याचे दडपण येऊ दिले नाही आणि शमीच्या षटकात त्याने १३ धावा चोपल्या. संजू सॅमसननेही GTचा कॅप्टन हार्दिकला ४,६ खेचले.
पॉवर प्लेच्या शेवटचं षटक टाकण्यासाठी राशीद खानला गोलंदाजीला आणले अन् संजूने पहिलाच चेंडू पॉईंटच्या दिशेने मारला. पण, तिथे अभिनव मनोहरचे चांगले क्षेत्ररक्षण झालेले पाहायला मिळाले. नॉन स्ट्रायकर एंडवरील यशस्वी तोपर्यंत धाव घेण्यासाठी स्ट्रायकर एंडपर्यंत पोहोचला. संजूचे सर्व लक्ष चेंडूकडे होते, तरीही यशस्वीची ही घाई महागात पडली. मोहित शर्माने चेंडू लगेच राशीदकडे टाकला अन् यशस्वी १४ धावांवर रन आऊट झाला. RR ने पॉवर प्लेमध्ये २ बाद ५० धावा केल्या. जोशूया लिटलला संजूने दोन सलग चौकार खेचले, परंतु त्यानेही पुढच्या चेंडूवर विकेट काढली. संजूने मारलेला चेंडू जागच्याजागी उंच उडाला अन् त्याचा झेल टिपला गेला. संजूने २० चेंडूंत ३० धावा केल्या.