Join us  

Yashasvi Jaiswal, IPL 2023: यशस्वी जैस्वालला शतक करायचंच नव्हतं... त्याने स्वतःच सांगितलं कारण

IPL 2023 KKR VS RR: यशस्वी जैस्वालने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध नाबाद 98 धावांची खेळी केली. त्याला शतक पूर्ण करता आले नाही याचे चाहत्यांना दु:ख आहे, पण यशस्वी जैस्वालच्या मनात याची अजिबात खंत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 5:05 PM

Open in App

Yashasvi Jaiswal, IPL 2023 KKR VS RR: यशस्वी जैस्वालने आपल्या बॅटने आयपीएलमध्ये खळबळ उडवून दिली. या डावखुऱ्या सलामीवीराने ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सला दणके दिले. जैस्वालने अवघ्या 47 चेंडूत 98 धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीत ५ षटकार आणि १३ चौकारांचा समावेश होता. यशस्वी जैस्वालने आपल्या संघाला दणदणीत विजय मिळवून दिला, पण या खेळाडूचे शतक केवळ 2 धावांनी हुकले. या गोष्टीची खंत त्याच्या चाहत्यांना आहे, पण जैस्वाल मात्र त्याबद्दल दु:खी नाहीत. सामन्यानंतर त्यानेच याबद्दल सांगितले.

माझ्या मनात शतकाचा अजिबात विचार नव्हता. आमच्या डोक्यात फक्त नेट रनरेटचा विचार सुरू होता. मी आणि संजू भाई खेळ लवकरात लवकर संपवण्याबद्दल बोलत होतो, असे जैस्वाल म्हणाला. यशस्वी जैस्वालने शेवटच्या चेंडूवर असा शॉट खेळला ज्यावर फक्त चार धावाच मिळू शकल्या. शतकासाठी त्याला 6 धावांची गरज होती पण त्याने संघाचा विचार केला. यशस्वीला हवे असते तर तो त्या चेंडूचा बचाव करू शकला असता आणि षटकारासाठी लेन्थ बॉलची वाट पाहू शकला असता. पण या त्याने तसे केले नाही. त्याने केवळ आपला स्ट्रोक खेळला. संजू सॅमसननेही एका षटकात तीन षटकार मारून संघाच्या नेट रनरेटला अधिक महत्त्व दिल्याचे स्पष्ट केले.

जैस्वालने मने जिंकली

यशस्वी जैस्वालने केवळ 13 चेंडूत अर्धशतक ठोकले. या खेळाडूने केएल राहुलचा विक्रम मोडला. त्याने 2018 मध्ये केवळ 14 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला होता. यशस्वी जैस्वालने या खेळीचे वर्णन आपल्या सरावाचे फळ असे केले. या मोसमासाठी चांगली तयारी केल्याचे जयस्वालने सांगितले. त्याचा स्वतःवर विश्वास आहे आणि त्याला माहित आहे की त्याचे परिणाम नक्कीच येतील, असे तो म्हणाला.

बटलर धावबाद झाल्यानंतर जैस्वालने वेग पकडला

जैस्वालकडून डावाच्या सुरुवातीलाच मोठी चूक झाली. त्याने त्याचा फलंदाज जोडीदार जोस बटलरला धावबाद केले होते. मात्र, त्यानंतर त्याने आपला राग केकेआरच्या गोलंदाजांवर काढला. जैस्वालने नितीश राणाच्या पहिल्याच षटकात २६ धावा ठोकल्या. जैस्वालने पहिल्या दोन चेंडूत सलग दोन षटकार मारले आणि त्यानंतर त्याच षटकात तीन चौकारही मारले. जयस्वालचा हा वेग थांबला नाही आणि या खेळाडूने 41 चेंडूंत चौकार आणि षटकारांची बरसात करत राजस्थानला विजय मिळवून दिला.

टॅग्स :आयपीएल २०२३राजस्थान रॉयल्ससंजू सॅमसनकोलकाता नाईट रायडर्स
Open in App