IPL 2023, Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Live : लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याच्यावर स्ट्राईक रेटवरून जोरदार टीका होताना दिसतेय... राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीतही त्याचा स्ट्राईक रेट चर्चेचा विषय ठरला. सलामीला आलेल्या लोकेशला आजही मोठी खेळी करता आली नाही आणि ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर तो चाचपडताना दिसला. पहिल्या षटकात तर त्याला एकही धाव घेता आली नाही. क्षेत्ररक्षणावरील मर्यादेचा त्याला फायदा उचलता आला नाही आणि यावरून इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन ( Kevin Pietersen) याने टीका केली. लोकेश राहुलच्या खेळीचा त्याने कंटाळवाणा असा उल्लेख केला.
''लोकेश राहुलला पॉवर प्लेमध्ये खेळताना पाहणे हे अत्यंत कंटाळवाणे आहे, यापूर्वी मी इतका कंटाळवाणा खेळ पाहिला नव्हता,''असे पीटरसन ऑन एअर म्हणाला. लोकेशने पॉवर प्लेमध्ये १९ चेंडूंत १९ धावा केल्या. या दरम्यान त्याला दोन जीवदान मिळाले आणि एकदा रन आऊट होता होता वाचला. कायल मायर्सलाही आज धावांसाठी संघर्ष करावा लागला. पॉवर प्लेमध्ये LSG ने ३७ धावा केल्या. युझवेंद्र चहलने टाकलेल्या नवव्या षटकात लोकेशने षटकार खेचला, परंतु ११व्या षटकात जेसन होल्डरने त्याची विकेट घेतली. लोकेश ३२ चेंडूंत ३९ धावांवर बाद झाला. १२१.८८ असा त्याचा आजचा स्ट्राईक रेट होता.
आयपीएल २०२३ मधील लोकेशची पॉवर प्लेमधील कामगिरी - १२ चेंडूंत ८ धावा वि. दिल्ली कॅपिटल्स, स्ट्राईक रेट - ६६.७- १३ चेंडूंत १९ धावा वि. चेन्नई सुपर किंग्स, स्ट्राईक रेट - १४६.१५ - १४ चेंडूंत १८ धावा वि. सनरायझर्स हैदराबाद, स्ट्राईक रेट - १२८.१६ - १२ चेंडूंत नाबाद ११ धावा वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, स्ट्राईक रेट - ९१.७- १७ चेंडूंत नाबाद २० धावा वि. पंजाब किंग्स, स्ट्राईक रेट ११७.६५