IPL 2023, Rajasthan Royals vs Punjab Kings Live : राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सचा संघ विजयी लय कायम राखण्यासाठी आज गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर खेळत आहेत. राजस्थान रॉयल्सने बार्सपारा स्टेडियमला त्यांचे दुसरे होम ग्राउंड बनवले आहे. प्रभसिमरन सिंग ( Prabhsimran Singh) आक्रमक खेळी करताना पंजाब किंग्सला दमदार सुरूवात करून दिली. जेसन होल्डरला त्याची विकेट मिळवता आली, परंतु PBSKचा कर्णधार शिखर धवन याने स्वतःच्याच फॉर्मात असलेल्या फलंदाजाला रिटायर्ड हर्ट केले.
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पंजाब किंग्सच्या सलामीवीरांनी त्यांना झोडून काढले. प्रभसिमरन सिंगने अनपेक्षित वादळी खेळी केली. समालोचक किरण मोरे यांनी आज प्रभसिमरन याच्याकडून दमदार खेळीची अपेक्षा व्यक्त केली होती आणि त्यावर तो खरा ठरला. २२ चेंडूंत ४४ धावा केल्यानंतर प्रभसिमरनचा झेल सुटला. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर उडालेला हा झेल अवघड होता आणि देवदत्त पडिक्कलला तो टिपता आला नाही. कर्णधार शिखर धवन संयमी खेळी करताना दिसला आणि PBKS ने ६ षटकांत ६३ धावा चोपल्या.
प्रभसिमरन सिंगने २८ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले. पंजाब किंग्सने पहिल्या विकेटसाठी झटपट ७० धावा जोडल्या. जेसन होल्डरनेच RR ला पहिली विकेट मिळवून दिली. प्रभसिमरन ३४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६० धावांवर बाद झाला. जॉस बटलरने अफलातून झेल टिपला. त्यानंतर आलेल्या भानुका राजपक्षाला रिटायर्ट हर्ट व्हावे लागले. आर अश्विनच्या गोलंदाजीवर शिखरने मारलेला जोरात फटका नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या राजपक्षाच्या उजव्या हाताच्या मनगटावर आदळला अन् त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"