Last Ball No Ball Sandeep Sharma, IPL 2023: संदीप शर्मा हे नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे राजस्थान विरूद्ध हैदराबाद हा सामना. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हैदराबादला विजयासाठी ५ धावा हव्या होत्या. संदीप शर्माने चेंडू टाकला, हैदराबादच्या अब्दुल समदने तो हवेत मारला, जोश बटलरने झेल घेत समदला बाद केले. राजस्थानने सामना जिंकला असं वाटत असतानाच भोंगा वाजला आणि चेंडू नो बॉल असल्याचे कळले. या प्रकारानंतर 'कहानी में ट्विस्ट' आलाच. SRH ला शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना समदने थेट षटकार मारला आणि सामना जिंकवला. त्यामुळे राजस्थानच्या संघाने जवळपास जिंकलेला सामना शेवटच्या चेंडूवरील नो बॉलमुळे गमावला. शेवटच्या चेंडूवर नो बॉल टाकणारा संदीप शर्मा पहिला गोलंदाज नाही. याआधीही असाच प्रकार घडला होता आणि त्या नो बॉल मुळे प्रतिस्पर्धी संघ जिंकला होता. जाणून घेऊया त्याबद्दल...
संदीप शर्माचा नो बॉल आणि नंतर अब्दुलचा षटकार-
राजस्थान-हैदराबाद सामन्यात संदीप शर्माने नो बॉल टाकला नसता तर RR विजयी झाले असते. पण तसे झाले नाही. असाच प्रकार दहा वर्षांपूर्वी IPL 2013 मध्ये घडला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज असा तो सामना होता. रविंद्र जाडेजा फलंदाजी करत होता, त्यावेळी समोर होता रूद्रप्रताप सिंग म्हणजेच RP Singh. आरपी सिंगने चेंडू टाकला. सीमारेषेवर उभ्या असलेल्या फिल्डरने तो झेल टिपला. त्यामुळे RCB जिंकली असे वाटत होते, पण अंपायरने नो बॉल दिला. त्यामुळे आरपी सिंगला पुन्हा चेंडू टाकावा लागला आणि त्यावर चेन्नईने विजयासाठी आवश्यक धावा करत सामना जिंकला होता. तशाच प्रकारचा खेळ आज पुन्हा संदीप शर्माकडून पाहायला मिळाला.
--
दरम्यान, रविवारच्या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर यशस्वी जैस्वालने १८ चेंडूत ३५ धावा केल्या. त्यानंतर संजू सॅमसन आणि जोस बटलर जोडीने १३८ धावांची भागीदारी केली. बटलरने ५९ चेंडूत ९५ धावा केल्या. संजूने ३८ चेंडूत नाबाद ६६ धावा केल्या आणि संघाला २० षटकात २१४ धावांपर्यंत पोहोचवले. २१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, अनमोलप्रीत सिंगने २५ चेंडूत ३३ धावा केल्या. अभिषेक शर्माने ५५ तर राहुल त्रिपाठीने ४७ धावा केल्या. १२ चेंडूत ४१ धावांची गरज असताना ग्लेन फिलिप्सने ७ चेंडूत २५ धावा केल्या. अखेर शेवटच्या चेंडूवर अब्दुल समदने षटकार खेचत सामना जिंकला.
Web Title: IPL 2023 RR vs SRH Live Last Ball No Ball Scene Sandeep Sharma RP Singh 2013 RCB vs CSK
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.