IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Live Marathi : दिल्ली कॅपिटल्स इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये पूर्णपणे अपयशी ठरताना दिसत होते, पण आज त्यांना सूर गवसला. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आजच्या सामन्यात DCच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून सामना अटीतटीचा आणला होता. पण, अखेरच्या तीन षटकांत हेनरिक क्लासेन व वॉशिंग्टन सुंदर यांनी सुरेख फटकेबाजी केली, परंतु मोक्याच्या क्षणी क्लासेनची विकेट पडली अन् सामन्यात पुन्हा रंजकता आली, पण हैदराबादने हातची मॅच घालवली. DC कर्णधार डेव्हिड वॉर्नरसाठी आजचा सामना भावनिक होता... ४ वर्षांनंतर तो त्याच्या आवडत्या आणि माजी संघाच्या मैदानावर खेळत होता. SRHने वॉर्नरला दिलेली वागणूक त्यांच्याही चाहत्यांना पटलेली नव्हती आणि त्याच मैदानावर वॉर्नरने माजी संघाला नमवून राग व्यक्त केला.
दिल्लीच्या फलंदाजांनी पुन्हा शरणागती पत्करली. वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sundar) याने एका षटकात ३ फलंदाजांना माघारी पाठवले. मिचेल मार्श ( २५) व डेव्हिड वॉर्नर ( २१) यांना मोठी खेळी करता आली नाही. मनीष पांडे व उप कर्णधार अक्षर पटेल यांनी SRHला चांगले प्रत्युत्तर दिले. भुवनेश्वर कुमारने अक्षरचा ( ३४) त्रिफळा उडवून ६९ धावांची भागीदारी तोडली. मनीष ( ३४) रन आऊट झाला. त्यानंतर दिल्लीचा डाव गडगडला आणि त्यांना ९ बाद १४४ धावा करता आल्या. वॉशिंग्टन ( ४-०-२८-३) व भुवी ( ४-०-११-२) यांनी अप्रतिम स्पेल टाकला.
इशांत शर्माच्या चौथ्याच चेंडूवर मिचेल मार्शने स्लीपमध्ये हॅरी ब्रूकला झेल सोडला. पण, त्याचा उपयोग ब्रूकला करून घेता आला नाही. एनरिच नॉर्खियाने सहाव्या षटकात ब्रुकचा ( ७) त्रिफळा उडवला. मयांक अग्रवाल आज चांगल्या टचमध्ये दिसला, परंतु DCच्या गोलंदाजांनी धावगतीवर अंकुश ठेवले होते. २७ चेंडूंनंतर SRHच्या फलंदाजांना चौकार मारण्यात यश आले. ४६ धावांवर मयांकचा सोपा झेल मुकेश कुमारने टाकला. धावा आणि चेंडू यांच्यातले अंतर वाढत असताना मयांकने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर ४९ धावा करणारा मयांक झेलबाद झाला.
राहुल त्रिपाठीला आज मोठी खेळी करता आली असती परंतु तो २१ चेंडूंत १५ धावा करून बाद झाला. अभिषेक शर्मा ( ५) कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर कॉट अँड बोल्ड झाला अन् SRHचा संघ अडचणीत सापडला. कर्णधार एडन मार्कराम व हेनरिच क्लासेन ही आफ्रिकन जोडी मैदानावर होती आणि SRHला ६ षटकांत ६० धावांची गरज होती. १५व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलने SRHच्या कर्णधाराचा दांडा उडवला. मार्करामच्या ( ३) बॅटची कड घेत चेंडू यष्टींवर आदळला. अक्षरने ४-०-२१-२ अशी उत्कृष्ट गोलंदाजी केली. कुलदीपनेही २२ धावांत १ विकेट घेतली आणि SRHला आता २४ चेंडूंत ५० धावांची गरज होती.
नॉर्खियाच्या पुढील षटकात १३ धावा चोपून SRHने अंतर थोडं कमी केलं. १८व्या षटकातही क्लासेन व वॉशिंग्टन सुंदर यांनी १५ धावा काढल्याने १२ चेंडू २३ धावा अशी मॅच जवळ आली. क्लासेन १९ चेंडूंत ३१ धावांवर झेलबाद झाला अन् पुन्हा सामना दिल्लीकडे झुकला. ६ चेंडूंत १३ धावा आता हैदराबादला करायच्या होत्या आणि वॉशिंग्टन स्ट्राईकवर होता. पण, हैदराबादला ६ बाद १३७ धावा करता आल्या आणि दिल्लीने ७ धावांनी सामना जिंकला. मुकेश कुमारने अखेरच्या षटकात १३ धावांचा यशस्वी बचाव केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"